Devendra Fadanvis Pudhari
मुंबई

Maharashtra Drought Relief| शेतकऱ्यांना थेट मदतीसह टंचाईच्या पार्श्वभूमीवर चारापाण्याचेही नियोजन: मुख्यमंत्री फडणवीस

दुष्काळी स्थितीची सरकारने गांभीर्याने घेतली दखल

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: राज्यातील दुष्काळाच्या स्थितीची राज्य सरकारने गांभीर्याने दखल घेतली आहे. दुष्काळी किंवा टंचाईच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठीच्या उपाययोजनांचे काम यापूर्वीच सुरू करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांना थेट मदत देण्यापासून काही ठिकाणी पाणी आणि चारा पुरविण्याचेही नियोजन करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली.

युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या मुंबई कॅम्पसच्या उद्‌घाटनानंतर माध्यमांशी संवाध साधताना फडणवीस यांनी दुष्काळी उपाययोजना तसेच राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेवर भाष्य केले.

शरद पवार यांनी दुष्काळासंदर्भात पत्र पाठविले, ही चांगली बाब आहे. त्यात मला राजकारण करायचे नाही. त्यांनी काही अधिकच्या सूचना केल्यास त्याचाही सरकार निश्चितपणे विचार करेल. राज्य सरकारने यापूर्वीच या संदर्भातील निर्णय घेतले आहेत. मागच्या मंत्रिमंडळ बैठकीतच दुष्काळासंदर्भात व संभाव्य मदतीबाबत चर्चा झाली, असे फडणवीस म्हणाले.

कर्जमाफीच्या आणखी याद्या येणार

राज्यात सध्या शेतकरी कर्जमाफीची योजनाही सुरू आहे. त्यामध्ये आपण तीन याद्या जाहीर केल्या असून आणखीही याद्या करणार आहोत. सर्व पात्र शेतकऱ्यांना मदत करणार आहोत. दुष्काळाच्या उपाययोजनाही सुरू करणार आहोत.

त्यासाठी एनडीआरएफ अंतर्गत केंद्राची मदतही घ्यायची आहे. मात्र त्यासाठी ५ ऑक्टोबरनंतरचेच पंचनामे ग्राह्य धरले जातात, तसे निकष आहेत. त्यामुळे तोपर्यंत वाट न पाहता आताच यासाठीची तयारी सुरू करण्यात आली आहे. केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकार मदत करणार असल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

राहुल गांधींची मानसिकता अराजकतावादी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्य टीकेचाही फडणवीस यांनी यावेळी समाचार घेतला. राहुल गांधी यांची मानसिकता अराजकतावादी आहे. हातात संविधान घेऊन संविधानावरचा लोकांचा विश्वास उडेल, अशीच पेरणी ते करत आहेत. देशातील सर्व संवैधानिक संस्थांवरचा, लोकशाहीवरचा लोकांचा विश्वास उडाला पाहिजे, अशी अराजकतावादी मानसिकता आहे.

मुळात भारतीयांनी राहुल गांधींना नाकारले आहे, हे सत्य ते स्वीकारू शकत नाहीत. जखम कपाळाला आहे, पण ते पट्टी गुडघ्याला बांधत आहेत. भारतीयांना काय हवे आहे, हे त्यांना ज्या दिवशी समजेल तेव्हाच कदाचित त्यांच्या शंभर पराभवांची मालिका थांबू शकेल, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT