Drought File Photo
मुंबई

Maharashtra Drought: राज्यात दुष्काळाचा मोठा परिणाम! ज्वारी बाजरी मुग आणि उडदाच्या पेरणीत मोठी घट; तुटवड्याची शक्यता

राज्यात सरासरीच्या ९७ टक्के क्षेत्रावर पेरणी; भाताची शंभर टक्के पेरणी, तर मक्याचे क्षेत्र १३० टक्क्यांवर

पुढारी वृत्तसेवा

गौरीशंकर घाळे

मुंबई: राज्यातील दुष्काळाने पालेभाज्यांना फटका बसलेला असतानाच कडधान्य आणि तृणधान्याचे क्षेत्रही लक्षणीय प्रमाणात घटले आहे. विशेषतः खरीपातील ज्वारीसह बाजरी, मुग आणि उडीदाची पेरणीचे क्षेत्रच ६० टक्क्यांच्या खाली आले आहे. त्यामुळे येत्या हंगामात कडधान्य आणि तृणधान्यांचा तुटवडा जाणवू शकतो.

राज्यातील दुष्काळी स्थितीच्या पार्श्चभूमीवर कृषी विभागाने राज्यभरातील पीक पेरणीबाबत तयार केलेल्या अहवालात चिंताजनक बाबी समोर आल्या आहेत. राज्यात सरासरी १४४.३६ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या होतात. यंदा सरासरीच्या ९७ टक्के म्हणजेच १४०.२६ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. मात्र, यातील मोठा वाटा भाताचा ज्याचा शंभर टक्के पेरा झाला आहे. तर, मक्याखालील क्षेत्र १३० टक्के आहे.

ज्वारी, बाजरी, मुग, उडदासह अन्य कडधान्य आणि तृणधान्यांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर घटले आहे. विशेषतः खरीपाची ज्वारी क्षेत्र फक्त ३४ टक्के इतकेच आहे. तर, बाजरी ५९ टक्के, मुग ५० टक्के आणि उडीद क्षेत्र ५६ टक्के इतकेच आहे. शिवाय, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने खंड दिल्याने पेरणी झालेल्या क्षेत्रातील उत्पादनही घटण्याची शक्यता आहे.

विदर्भात सोयाबीन आणि कापसाला फटका

विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम आणि अमरावतीसह अनेक जिल्ह्यांत सोयाबीनच्या शेंगांमध्ये दाणे पूर्ण न भरणे, तर कापसाच्या पात्या आणि फुलांची गळ होणे अशा समस्या दिसून येत आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील १६ तालुक्यांत ट्रिगर-१ लागू झाल्याची नोंद आहे.

उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातही चिंता

धुळे जिल्ह्यात पावसाचा खंड राहिल्याने मूग आणि उडदाच्या उत्पादनात मोठी घट दिसत असल्याचे पीक कापणी प्रयोगांतून नमूद करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यात सोयाबीनच्या शेंगा चपट्या राहणे, दाणे न भरणे आणि पिकांची पाने पिवळी पडून गळणे अशा समस्या आढळल्या आहेत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT