delimitation bill affect in maharashtra
मृणालिनी नानिवडेकर
मुंबई: संसदेने परिसीमन विधेयक पारित केल्यानंतर राज्यांनाही विधानसभेच्या जागा समप्रमाणात वाढवायच्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात १४४ अतिरिक्त जागा निर्माण होतील. महाराष्ट्रातील आमदारांची संख्या २८८ वरून ४३२ वर जाणार आहे. त्यातील ३३ टक्के आमदार महिला असल्याने या निर्णयानंतर १४४ महिला विधानसभेत दिसतील.
केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेल्या परिसीमन विधेयकामध्ये हा निर्णय प्रत्यक्षात येण्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहांत दोनतृतीयांश मत मिळणे आवश्यक आहे. ५० टक्के राज्यांनी या निर्णयाला पाठिंबा देणारे ठराव करायचे आहेत. देशातील अर्ध्या राज्यांनी जागा वाढवण्यास मान्यता दिल्यानंतर हा निर्णय प्रत्यक्षात येईल.
याच विधेयकाद्वारे राज्यांमधील लोकप्रतिनिधींची संख्याही वाढणार आहे. २०२९ च्या निवडणुकीच्या आधीच आमदारसंख्या वाढावी, असे निश्चित झाल्याचे समजते. एकदा कायदा पारित झाल्यानंतर तो प्रत्यक्षात आणणे आवश्यक राहील. २०२९ मध्ये महाराष्ट्रात ४३२ आमदार दिसतील.
विधेयकातील तरतुदींनुसार महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघांची संख्या ४८ वरून ७२ वर जाणार आहे. नव्या मतदारसंघांची आखणी करण्यासाठी तयार होणाऱ्या आयोगाचे प्रमुख सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त किंवा सेवेत असलेले न्यायाधीश असतात.
देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त किंवा त्यांचा प्रतिनिधी दुसरे सदस्य असतील, तर तिसरे सदस्य म्हणून त्या राज्यातील मुख्य निवडणूक अधिकारी काम करतील. महाराष्ट्रात मुख्य निवडणूक अधिकारी या आयोगावर काम करतील.
त्याचबरोबर परिसीमन विधेयक पारित झाल्यानंतर राज्यांमधील लोकप्रतिनिधींची संख्याही वाढणार आहे. विद्यमान रचनेमध्ये ही संख्या ही ५० टक्क्यांनी वाढवायचा प्रस्ताव ठेवला जाणार आहे.
दिल्लीतील लोकसभा नव्याने उभारताना वाढीव जागांची सोय करण्यात आली आहे. मात्र, महाराष्ट्रात विद्यमान विधानसभेच्या इमारतीत मुंबई, नागपूर येथे ४३२ आमदार बसू शकणार नाहीत. नव्या विधानसभेचे बांधकाम लवकरच हाती घेतले जाईल, असे सांगितले जात होते.
मात्र, त्या संबंधात कोणतीही हालचाल नाही. दुष्काळी वर्ष लक्षात घेता या बांधकामासाठी आवश्यक असलेली आर्थिक तरतूद करता येईल का? याबद्दल स्पष्टता नाही. त्यामुळे प्रेक्षक दीर्घांमध्ये आमदारांना बसवायची वेळ येईल काय, असे बोलले जाते आहे.
नव्याने संख्याबळ वाढल्यानंतर खासदार आणि आमदारांना बोलायला किती संधी मिळेल, याविषयी प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र, परिसीमन विधेयक पारित झाल्यास आमदारांची आणि खासदारांची संख्या वाढणार, हे निश्चित आहे.
५ खासदार व आमदार ठरवणार सीमा
आयोगावर त्या त्या राज्यातील ५ खासदार आणि पाच आमदार सदस्य म्हणून नेमण्यात येतील. विधानसभेचे अध्यक्ष या आमदारांची नावे निश्चित करतील. प्रत्येक राज्यात कोणत्या पक्षाची किती आमदारसंख्या आहे त्यावर हे पाच प्रतिनिधी कोण हे ठरेल.
खासदारांची नावे लोकसभेचे अध्यक्ष ठरवतील, तर पाच आमदारांची नावे विधानसभेचे अध्यक्ष ठरवणार आहेत. विधानसभेच्या अध्यक्षांनी ही पाच नावे केवळ एका महिन्याच्या मुदतीत निश्चित करायची आहेत. त्यामुळे विधेयक पारित झाल्यानंतर महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पाच आमदारांना या आयोगावर नेमावे लागणार आहे.