Maharashtra Dam Water Storage Pudhari
मुंबई

Maharashtra Dam Water Storage: महाराष्ट्रातील धरणसाठ्यात ११.६५% तूट; संभाजीनगर विभागात सर्वाधिक ३५.१६% घट

महाराष्ट्रातील धरणसाठ्यात गतवर्षाच्या तुलनेत ११.६५ टक्क्यांची तूट आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात ३५.१६%, अमरावतीत २०.१४% आणि नागपूर विभागात १३.६५% कमी पाणीसाठा नोंदवण्यात आला आहे.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: राज्याच्या विविध भागांतील पावसात मोठा खंड पडल्याने राज्य सरकारकडून उपाययोजनांचे नियोजन सुरू आहे. राज्यातील धरणसाठ्यातही मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे ११.६५ टक्क्यांची तूट असल्याची आकडेवारी सांगते.

विशेषतः छत्रपती संभाजीनगर विभागातील पाणीसाठा गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल ३५.१६ टक्क्यांनी कमी आहे. पाठोपाठ अमरावती २०.१४ आणि नागपूर विभागातील पाणीसाठा १३.६५ टक्क्यांनी कमी आहे. पुढील महिनाभरात परतीच्या पावसाने साथ न दिल्यास मराठवाडा आणि विदर्भासमोर पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

राज्यात मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागात पावसाने ओढ दिल्याचे चित्र आहे. जुलै महिन्यातील दमदार पावसामुळे राज्यातील मोठ्या धरणातील पाणीसाठा काही प्रमाणात वाढला. २१ सप्टेंबरच्या अहवालानुसार राज्यातील ३ हजार ३२ धरणांमध्ये एकूण उपलब्ध उपयोगी पाणीसाठा ३१ हजार ८३.०१ दशलक्ष घनमीटर असून, तो एकूण उपयुक्त साठ्याच्या ७६.१६ टक्के आहे.

गतवर्षी याच दिवशी हा साठा ३८ हजार ८४५.३४ दशलक्ष घनमीटर, म्हणजेच ८७.८१ टक्के होता. त्यामुळे यंदा गतवर्षाच्या तुलनेत ७ हजार ७६२.३३ दशलक्ष घनमीटर साठा कमी असून, टक्केवारीत तब्बल ११.६५ टक्क्यांची घट झाली आहे. विशेषतः छत्रपती संभाजीनगर विभागातील स्थिती चिंताजनक आहे.

या विभागातील धरणांमध्ये केवळ ५११३.७२ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. येथील उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी ४६.०५ टक्के इतकी कमी आहे. गेल्यावर्षी याच काळात तब्बल ८१.२१ टक्के जलसाठा होता. त्यामुळे यंदा ३५.१६ टक्के कमी पाणीसाठा आहे. पाठोपाठ अमरावती विभागात २०.१४ टक्के, नागपूर विभागात १३.६५ टक्के इतका कमी पाणीसाठा आहे.

त्यामुळे परतीच्या पावसाने हात न दिल्यास या भागातील चिंता वाढण्याची शक्यता आहे.दुसरीकडे, पुणे विभागातील धरणांमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत ४.३६ टक्के कमी पाणीसाठा आहे. कोकणातील धरणांतील पाणीसाठ्यातील तुटीचे प्रमाण १.७५ टक्के इतके आहे. तर, नाशिक विभागात केवळ ०.४६ टक्के इतकीच तूट नोंदविण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT