मुंबई: सीजीपी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर पसरविण्यात आलेल्या फेक न्यूज, दिशाभूल करणारे व्हिडिओ आणि एआयच्या मदतीने तयार किंवा बदललेला मजकूर याचा महाराष्ट्र सायबरकडून तपास सुरू आहे.
आतापर्यंत इन्स्टाग्राम, एक्स, फेसबुक आणि यूट्यूब या प्लॅटफॉर्मवर ४२९ आक्षेपार्ह पोस्ट आणि हँडल्स आढळून आले आहेत. त्यापैकी १४०हून अधिक पोस्ट आणि प्रोफाइलमध्ये एआय-जनरेटेड किंवा एआय-असिस्टेड कंटेंट असल्याचे तांत्रिक तपासात समोर आले आहे.
अतिरिक्त पोलीस महासंचालक (राज्य सायबर) यशस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सायबर पथकाने या प्रकरणात तंत्रज्ञानाच्या मदतीने सोशल मीडिया कंटेंटची छाननी सुरू केली. मोठ्या प्रमाणावर ओपन-सोर्स इंटेलिजन्स, मेटाडेटा तपासणी, वर्तनाचे विश्लेषण तसेच एआय आणि डीपफेक कंटेंटचे फॉरेन्सिक परीक्षण करण्यात आले. या तपासात ५००हून अधिक सोशल मीडिया प्रोफाइल व्यापक तपासाच्या कक्षेत आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
एआयच्या मदतीने बनावट दृश्ये
तपासात काही पोस्टमध्ये डिजिटल पद्धतीने वाढवून दाखवलेली गर्दी, कृत्रिम आवाज, क्लोन केलेला ऑडिओ आणि सार्वजनिक व्यक्तींच्या नावाने प्रसारित केलेले फेरफार केलेले व्हिडिओ आढळले.
या माध्यमातून आंदोलनाबाबत चुकीचे चित्र निर्माण करून लोकांची दिशाभूल करण्याचा आणि वातावरणावर परिणाम करण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय आहे. महाराष्ट्र सायबरच्या तांत्रिक विश्लेषणात १४०हून अधिक पोस्ट आणि प्रोफाइलमध्ये एआयचा वापर झाल्याचे आढळले. काही कंटेंटमध्ये आवाजाची नक्कल तसेच व्हिडिओमध्ये फेरफार करण्यात आल्याचेही समोर आले आहे.
सुमारे १०० खाती परदेशातून
या प्रकरणातील सुमारे १०० सोशल मीडिया खाती भारताबाहेरून चालवली जात असल्याचा संशय आहे. यामध्ये पाकिस्तान तसेच काही पश्चिम आशियाई देशांमधून चालविल्या जाणाऱ्या खात्यांचा समावेश असल्याचा समावेश आहे. या खात्यांमधून भारतीय प्रेक्षकांना लक्ष्य करणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या मजकुराचा प्रसार केल्याचा संशय आहे.
दरम्यान, परदेशातून एखादे खाते चालवले जात असल्याचे आढळले म्हणून संबंधित व्यक्ती थेट कटात सहभागी असल्याचा निष्कर्ष काढता येणार नाही.
संबंधित खात्यांचा प्रत्यक्ष वापरकर्ता, कंटेंटचा मूळ स्रोत आणि विविध खात्यांमधील संबंध याचा पुढील तपास महत्त्वाचा ठरणार आहे. दरम्यान, आक्षेपार्ह कंटेंटविरोधात महाराष्ट्र सायबरने संबंधित सोशल मीडिया कंपन्यांशी संपर्क साधून पोस्ट आणि हँडल्स हटविण्याची कारवाई सुरू केली आहे. ओळख पटलेल्या खात्यांविरोधात कायदेशीर कारवाईही सुरू करण्यात आली आहे.
फॉरवर्ड करण्यापूर्वी सत्यता तपासा
आंदोलन, पोलिसांची कारवाई, अटक किंवा हिंसाचाराशी संबंधित कोणताही व्हिडिओ अथवा संदेश मिळाल्यास तो तातडीने पुढे पाठवू नये. अधिकृत सरकारी स्रोत आणि विश्वासार्ह माध्यमांमधून माहितीची खातरजमा केल्यानंतरच ती शेअर करावी, असे सायबर पोलिसांनी आवाहन केले आहे. महाराष्ट्र सायबरने नागरिकांना ‘थांबा, सत्यता तपासा आणि मगच शेअर करा’ असा संदेश दिला आहे.
तपासाचा फोकस
पोस्ट कोणी तयार केल्या, त्यांचा प्रसार कोणत्या खात्यांमधून झाला, एआयचा वापर कोणी केला आणि विविध खात्यांमध्ये परस्पर समन्वय होता का, याचा शोध महाराष्ट्र सायबर घेत आहे. या तपासातून सोशल मीडियावरील संघटित दिशाभूल मोहिमेचा नेमका स्रोत आणि त्यामागील व्यक्ती किंवा समूह समोर येण्याची शक्यता आहे.