मुंबई: ज्या सहकारी साखर कारखान्यांनी ग्रामीण महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा पाया रचला, त्या सहकारी कारखानदारीला घरघर लागली आहे. गेल्या २५ वर्षांत सहकारी साखर कारखान्यांची संख्या निम्म्याने घटली आहे. या कारखान्यांच्या पुनरुज्जीवनासाठी विशेष समितीची स्थापना करण्यात आली आहे.
राज्यात २००० पूर्वी २०० पेक्षा जास्त सहकारी साखर कारखाने कार्यरत होते. मात्र, मागील २५ वर्षांत प्रत्यक्ष गाळप करणाऱ्या सहकारी साखर कारखान्यांची संख्या १०० च्या आत आली आहे. त्यातही स्वबळावर गाळप करणारे कारखाने सध्या केवळ ७५ च्या आसपास उरले आहेत.
या पार्श्वभूमीवर राज्यातील सहकारी साखर कारखाने सुरू राहावेत, त्यांची आर्थिक स्थिती सुधारावी आणि अडचणीत आलेल्या कारखान्यांचे पुनरुज्जीवन व्हावे, यासाठी सहकार विभाग आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संयुक्त अभ्यासातून नवीन मॉडेल तयार करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
त्यासाठी साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली १३ जणांची विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीला दोन महिन्यांच्या आत सविस्तर अहवाल शिफारशीसह सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
गेल्या २५ वर्षांत आर्थिक अडचणी, अवसायन प्रक्रिया आणि अन्य कारणांमुळे अनेक कारखाने बंद पडले किंवा विक्री झाले. सध्या ३० ते ३२ सहकारी साखर कारखाने खासगी व्यवस्थापनामार्फत भाडेतत्त्वावर अथवा सहयोगी तत्त्वावर चालविले जातात.
मागील दोन वर्षांत शासन हमीवर एनसीडीसीमार्फत ३३ सहकारी साखर कारखान्यांना आर्थिक सहाय्य मिळाले. मात्र हे सहाय्य मिळूनही संबंधित कारखान्यांची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे सक्षम झालेली नाही.
हे कारखाने टिकविण्यासाठी आर्थिक मॉडेलचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती सहकारी साखर कारखान्यांच्या आर्थिक अडचणी, कर्जाचा बोजा, गाळप क्षमता, उत्पादन खर्च आणि आर्थिक व्यवहार्यता यांचा अभ्यास करणार आहे.
प्रत्येक कारखान्याची स्वतंत्र आर्थिक व्यवहार्यता तपासणे, प्रत्येक हंगामासाठी स्वतंत्र कॅश क्रेडिट खाते, एस्क्रो खाते, कर्जपुरवठा व वसुली धोरण तसेच पुनरुज्जीवन आणि पुनर्वसन निधी यांसारख्या बाबींवर शिफारशी केल्या जाणार आहेत.
केंद्र २०, राज्य १० व कारखाना ७०% आर्थिक सहभागाचे मॉडेल?
या कारखान्यांना सक्षम करण्यासाठी केवळ साखर उत्पादनावर अवलंबून न राहता कारखान्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी इथेनॉल, सीबीजी, सहवीज निर्मिती, सौरऊर्जा, हरित हायड्रोजन, शाश्वत विमान इंधन आणि जैव रसायने अशा दहा उपपदार्थांच्या निर्मितीवर आधारित एकात्मिक बायोरिफायनरी मॉडेल तयार करण्याचाही समिती अभ्यास करणार आहे.
यासाठी केंद्र सरकारचा २० टक्के, राज्य सरकारचा १० टक्के आणि कारखान्याचा ७० टक्के आर्थिक सहभाग असलेल्या वित्तीय प्रारूपाची व्यवहार्यता तपासली जाणार आहे