पुढारी ऑनलाईन डेस्क
बॉलिवूड अभिनेता आणि शिंदेंच्या शिवसेनेचे नेते गोविंदा (Actor Govinda News) यांना मंगळवारी पहाटे त्यांच्याच रिव्हॉल्वरची गोळी लागली. यामुळे ते जखमी झाले. गोविंदा यांना तातडीने रुग्णालयात नेल्यानंतर त्यांच्या पायात लागलेली गोळी काढण्यात आली. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोविंदा यांच्याशी फोनवरुन संपर्क साधून त्यांच्या प्रकृतीबद्दल विचारपूस केली.
याबाबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "गोविंदा यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मी वैयक्तिकरित्या त्यांच्याशी संपर्क साधला. राज्य सरकार आणि राज्यातील लोकांच्या वतीने, मी त्यांना लवकर आणि पूर्ण बरे होण्यासाठी शुभेच्छा देतो. मी गोविंदा यांना आश्वासन दिले आहे की त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना या आव्हानात्मक काळात सर्वोतोपरी सहकार्य करु. गोविंदा हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी आपल्या अभिनयाद्वारे लाखो लोकांची मने जिंकली आहेत. ते लवकर बरे व्हावेत अशी आमची प्रार्थना आहे.”
अभिनेता गोविंदा (Actor Govinda) यांना मंगळवारी सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गोविंदा यांच्या पायावर आज सकाळी चुकून त्यांच्याच रिव्हॉल्वरची गोळी लागली. यामुळे ते जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले.
गोविंदा आज पहाटे कोलकात्याला जाण्याच्या तयारीत होते. या दरम्यान त्यांच्या पायाला गोळी लागण्याची घटना घडली. त्यांच्या पायातून गोळी काढण्यात आली असून त्याची प्रकृती आता स्थिर असल्याची पुष्टी गोविंदा यांच्या व्यवस्थापकाने केली. “कोलकाता येथे एका कार्यक्रमाला जाण्यासाठी सकाळी ६ वाजण्याची विमानाची वेळ होती. आपण विमानतळावर पोहोचलो होतो. ही घटना घडली तेव्हा गोविंदा त्यांचे निवासस्थान सोडून विमानतळाकडे निघाले होते,” असे गोविंदा यांचे व्यवस्थापक शशी सिन्हा यांनी सांगितले.
"गोविंदा यांच्याकडे परवाना असलेले रिव्हॉल्व्हर असून ते त्यांच्या हातातून पडले आणि यादरम्यान त्यातून एक गोळी सुटली आणि ती गोविंदा यांच्या पायाला लागली. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी गोळी काढली असून आता त्याची प्रकृती ठीक आहे. ते सध्या रुग्णालयात आहेत," असेही ते पुढे म्हणाले.