Admission Pudhari
मुंबई

11th Admission: राज्यात अकरावीच्या अजूनही दहा लाख जागा रिकाम्याच

प्रवेशासाठी तिसरी विशेष फेरी सुरू; २२ जुलैपर्यंत प्रवेश घ्यावा लागणार

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: राज्यात अकरावी प्रवेशासाठी तिसरी विशेष फेरी राबविण्यात येत असली तरी अद्याप १० लाख ६६ हजार जागा रिक्त असल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत राज्यातील २२ लाख २९ हजार ५१८ प्रवेशक्षमतेपैकी १२ लाख १० हजार ४१४ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. निम्म्याहून अधिक जागा भरल्या असल्या तरी राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील दहा लाखांहून अधिक जागा अद्याप रिकाम्याच आहेत.

राज्यातील ९ हजार ६९८ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू असून आतापर्यंत वारंवार जाहीर होत असलेल्या फेरीत १५ लाख १८ हजार ९७० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

कॅप (केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया) अंतर्गत १८ लाख ८६ हजार ३९ जागांपैकी १० लाख ६१ हजार २७३ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला असून ८ लाख २४ हजार ७६६ जागा अद्याप रिक्त आहेत.

तर विविध कोट्यांतील ३ लाख ४३ हजार ४७९ जागांपैकी १ लाख ४९ हजार १४१ प्रवेश झाले असून १ लाख ९४ हजार ३३८ जागा रिक्त आहेत. त्यामुळे कॅप आणि कोटा या दोन्ही मिळून राज्यात 10 लाख 66 हजार 532 जागा अद्याप उपलब्ध आहेत.

विशेष फेरीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या रिक्त जागांच्या यादीवरून सर्वच विभागांमध्ये विशेषतः कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांमध्ये मोठ्या प्रमाणावर जागा शिल्लक असल्याचे दिसून येते. विशेष फेरीअंतर्गत २० जुलै रोजी सकाळी १० वाजता विद्यार्थ्यांसाठी कनिष्ठ महाविद्यालय वाटप यादी, कट-ऑफ यादी आणि विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये महाविद्यालयाचा तपशील प्रसिद्ध करण्यात आला.

त्याचबरोबर महाविद्यालयांच्या लॉगिनमध्ये वाटप झालेल्या विद्यार्थ्यांची यादी उपलब्ध करून देण्यात आली असून पात्र विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारेही माहिती पाठविण्यात आली आहे. इन-हाऊस, व्यवस्थापन आणि अल्पसंख्याक कोट्यांतील अर्जदारांची यादीही संबंधित महाविद्यालयांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.

२० जुलै सकाळी ११ ते २२ जुलै सायंकाळी ६ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना वाटप झालेले महाविद्यालय स्वीकारून 'प्रोसीड फॉर ॲडमिशन' पर्यायाद्वारे प्रवेश निश्चित करता येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात प्रत्यक्ष जाऊन कागदपत्रांची पडताळणी करून विहित शुल्क भरावे लागणार आहे. महाविद्यालयांकडून प्रवेशाची पुष्टी, नकार किंवा प्रवेश रद्द करण्याची कार्यवाही या कालावधीत केली जाणार आहे.

तसेच विविध कोट्यांतील पात्र विद्यार्थ्यांनीही संबंधित महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. यानंतर २३ जुलै रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत महाविद्यालयांना राखीव कामकाज पूर्ण करावे लागणार असून त्याच दिवशी प्रवेश प्रक्रियेचा डेटा प्रोसेस केला जाईल.

त्यानंतर २४ जुलै रोजी दुपारी १ वाजता पुढील टप्प्यासाठीची रिक्त जागांची अद्ययावत यादी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. महाविद्यालयांकडून प्रवेशाची पुष्टी, नकार किंवा प्रवेश रद्द करण्याची कार्यवाही या कालावधीत केली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT