मुंबई: राज्यातील तांत्रिक, व्यावसायिक, वैद्यकीय आणि उच्च शिक्षणातील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या सर्व सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) आता वर्षातून दोनदा घेण्यात येणार आहेत.
नव्या शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय लागू करण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यामुळे एका परीक्षेत अपेक्षित गुण न मिळालेल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या परीक्षेत गुण सुधारण्याची संधी मिळणार आहे.
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत विविध अभ्यासक्रमांसाठी एकूण १९ सीईटी घेतल्या जातात. यंदा अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि व्यवस्थापन या तीन अभ्यासक्रमांसाठी यंदाच्या मार्च आणि मेमध्ये त्या झाल्या होत्या.
यावेळी दोन वेळा परीक्षा देण्याची संधी देण्यात आली होती. मात्र, आता या निर्णयाचा विस्तार करून सर्वच अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांसाठी दोन संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामध्ये विधी आणि बीएडसारख्या अभ्यासक्रमांचाही समावेश असेल. राज्यात दरवर्षी सीईटी देणाऱ्या १४ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना या निर्णयाचा लाभ होण्याची अपेक्षा आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठातील कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी ही माहिती दिली. दोन वेळा सीईटी घेण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना पहिल्या परीक्षेतील गुणांवर अवलंबून राहावे लागणार नाही. पहिल्या परीक्षेपेक्षा दुसऱ्या परीक्षेत अधिक गुण मिळवून प्रवेशाची संधी वाढवता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
सीईटीची कार्यपद्धती १५ दिवसांत
सर्व सीईटी वर्षातून दोनदा घेण्यासाठी आवश्यक कार्यपद्धती सीईटी कक्षाकडून तयार करण्यात येत आहे. येत्या १५ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन आहे. परीक्षा केंद्रांचे नियोजन, परीक्षा घेण्याची पद्धत, नियमावली तसेच उत्तरपत्रिका तपासण्याची यंत्रणा याबाबत या कार्यपद्धतीत स्पष्टता आणण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
यंदा अभियांत्रिकीची सीईटी जेईईच्या धर्तीवर डिसेंबर आणि मार्च-एप्रिलमध्ये घेण्याचे नियोजन होते. मात्र, विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करून परीक्षेचे वेळापत्रक मार्च-एप्रिल-मे या कालावधीत ठेवण्यात आले होते. आता सर्व अभ्यासक्रमांच्या सीईटी दोनदा घेण्याच्या निर्णयानंतर परीक्षांचे वेळापत्रक आणि अंमलबजावणी केली जाणार आहे.