CET Exam Schedule 2027 pudhari photo
मुंबई

CET Exam Schedule 2027 : सामाईक प्रवेश परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

२८ जानेवारीपासून सुरुवात; ११ अभ्यासक्रमांसाठी दोन संधी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : राज्यातील पदवी आणि पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) शैक्षणिक वर्ष २०२७-२८ चे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार २८ जानेवारी २०२७ पासून सीईटी परीक्षांना सुरुवात होणार असून, १० जूनपर्यंत विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा पार पडणार आहेत. यंदा एकूण २१ सीईटी परीक्षा घेतल्या जाणार असून, त्यापैकी ११ अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना दोन वेळा परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. गेल्या वर्षी तीन अभ्यासक्रमांसाठी असलेली दोन परीक्षांची सुविधा यंदा आणखी आठ अभ्यासक्रमांना लागू करण्यात आली आहे.

राष्ट्रीय स्तरावर जेईई मुख्यची दोन वेळा परीक्षा घेतली जाते. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनाही अधिक संधी मिळावी, या उद्देशाने मागील वर्षी पीसीएम, पीसीबी आणि एमबीए/एमएमएस या तीन अभ्यासक्रमांसाठी दोन वेळा सीईटी घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या प्रयोगाला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेऊन यंदा पीजीडीएम, पीजीसीएम, पाच वर्षीय एलएलबी, बीएचएमसीटी, बीसीए, बीबीए, बीएमएस आणि बीबीएम या आणखी आठ अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे.

त्यामुळे दोन वेळा परीक्षा देण्याची संधी मिळणाऱ्या अभ्यासक्रमांची संख्या ११ झाली आहे. विद्यार्थ्यांना दोनपैकी पहिली सीईटी देणे बंधनकारक असून, दुसरी परीक्षा ऐच्छिक राहणार आहे. दोन्ही परीक्षा दिल्यास प्रवेश प्रक्रियेसाठी ज्या परीक्षेत अधिक पर्सेंटाइल गुण मिळतील, ते गुण ग्राह्य धरले जाणार आहेत.

यंदापासून पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट (पीजीडीएम), पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट इन मॅनेजमेंट (पीजीसीएम) आणि जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी (जीएनएम) या तीन व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रथमच सीईटी घेतली जाणार आहे. त्यापैकी पीजीडीएम आणि पीजीसीएमच्या परीक्षा दोन वेळा होणार आहेत.

दुसरीकडे, तीन वर्षीय एकात्मिक बीएड-एमएड अभ्यासक्रमाची सीईटी यंदापासून बंद करण्यात आली आहे. राज्यात हा अभ्यासक्रम एकाच संस्थेत सुरू असून, ५५ जागांपैकी यंदा केवळ १२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT