मुंबई : नगरपरिषदा, नगरपंचायतींमध्ये थेट निवडून आलेल्या अध्यक्षाला सदस्यत्व आणि मताचा अधिकार देण्यासाठी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 मध्ये सुधारणा करण्यासाठी अध्यादेश काढण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असलेली व्यक्ती अध्यक्ष म्हणून निवडून येण्यासही पात्र असते. संबंधिताला दोन्ही पदांसाठी जनादेश मिळालेला असतो. यास्तव सदस्यांमधून अध्यक्ष म्हणून निवडून आलेली व्यक्ती सदस्य राहते आणि त्याचबरोबर अध्यक्ष व सदस्य म्हणूनही काम करते.
अध्यक्षाला निर्णायक मताचाही अधिकार
थेट निवडून आलेल्या आणि सदस्यांमधून निवडून आलेल्या अध्यक्षाला जनादेश असतोच. त्यामुळे या सुधारणेनुसार आता अध्यक्ष म्हणून थेट निवडून आलेली व्यक्ती आणि सदस्य म्हणून थेट निवडून आलेली व्यक्ती एकाचवेळी दोन्ही पदे धारण करू शकते. तशी सुधारणा करण्यात येणार आहे. तसेच, अध्यक्षाला सदस्य म्हणून एक मत देण्याचा अधिकार मिळणार आहे. मते समसमान झाल्यास, अध्यक्षाला निर्णायक मत देण्याचा अधिकार राहणार आहे, अशी सुधारणा या अधिनियमात केली जाणार आहे. त्याबाबतचा अध्यादेश काढण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी धाराशिवमध्ये जागा
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यासाठी धाराशिव नगरपरिषदेला शहरातील दुग्धव्यवसाय विकास विभागाची एक एकर जागा देण्यास बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या पुतळ्यासाठी जमीन मिळावी, अशी मागणी लोकप्रतिनिधी, विविध संघटनांनी शासनाकडे केली होती.