Admission Pudhari
मुंबई

Medical Admission 2026: बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस प्रवेश नोंदणी सुरू; १८ सप्टेंबरपर्यंत अर्जाची मुदत

पहिली प्रवेश गुणवत्ता यादी २७ सप्टेंबरला

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: राज्यातील आयुर्वेद, होमिओपॅथी, यूनानीसह विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीला सुरुवात झाली आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे बीएएमएस (आयुर्वेद), बीएचएमएस (होमिओपॅथी), बीयूएमएस (युनानी), बीपीटीएच (फिजिओथेरपी), बीओटीएच (व्यावसायिक उपचारशास्त्र), बीएएसएलपी (वाणी व श्रवणशास्त्र), बीपी अँड ओ (कृत्रिम अवयव व अस्थिव्यंगोपचार) आणि बीएनवायएस (निसर्गोपचार व योगशास्त्र) या अभ्यासक्रमांच्या प्रवेश नोंदणीला सुरुवात झाली आहे.

विद्यार्थ्यांना १८ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. पहिली प्रवेश गुणवत्ता यादी २७ सप्टेंबर रोजी जाहीर होणार आहे.

प्रवेश नोंदणी १४ ते १८ सप्टेंबरदरम्यान सायंकाळी ५ वाजेपर्यंत करता येणार असून नोंदणी शुल्क भरण्याची अंतिम वेळ १८ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेपर्यंत आहे. आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याची मुदत त्याच दिवशी रात्री १० वाजेपर्यंत आहे. कागदपत्र पडताळणी १५ ते १९ सप्टेंबरदरम्यान ऑनलाइन किंवा प्रत्यक्ष पद्धतीने होईल.

नोंदणीकृत उमेदवारांची यादी आणि तात्पुरती गुणवत्ता यादी २० सप्टेंबर रोजी जाहीर होणार आहे. गुणवत्ता यादीवरील हरकती २१ व २२ सप्टेंबरदरम्यान नोंदवता येतील. अंतिम गुणवत्ता यादी आणि जागांचा तपशील २४ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होईल. त्यानंतर २४ ते २६ सप्टेंबरदरम्यान रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाइन पसंतीक्रम भरता येणार आहे.

बीएएमएस, बीएचएमएस आणि बीयुएमएस अभ्यासक्रमांची पहिली प्रवेश गुणवत्ता यादी २७ सप्टेंबर रोजी जाहीर होईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना २८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबरदरम्यान सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत संबंधित महाविद्यालयात मूळ कागदपत्रे आणि आवश्यक शुल्कासह प्रवेश निश्चित करावा लागणार असल्याचे सीईटी सेलने म्हटले आहे.

राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट) उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या केंद्रीकृत प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र आहेत. विद्यार्थ्यांनी प्रवेश संकेतस्थळावर नोंदणी करून आवश्यक कागदपत्रांच्या रंगीत छायांकित प्रती अपलोड कराव्यात. कागदपत्र पडताळणीसाठी निवडलेल्या केंद्रावर मूळ कागदपत्रांसह प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे. नोंदणी शुल्क ऑनलाइन भरणे बंधनकारक असून शुल्क भरल्यानंतरच उमेदवार प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणीकृत मानला जाणार आहे.

दिव्यांग विद्यार्थ्यांनी अधिकृत वैद्यकीय मंडळाने जारी केलेले दिव्यांग पात्रता प्रमाणपत्र सादर करावे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) प्रवर्गाचा दावा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी वैध प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. आरक्षण प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र आणि लागू असल्यास नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्र सादर करावे. आवश्यक कागदपत्रे अपलोड न करणाऱ्या विद्यार्थ्यांचा संबंधित प्रवर्गातील प्रवेशासाठी विचार केला जाणार नाही.

बीपीटीएच, बीओटीएच, बीएएसएलपी, बीपी अँड ओ आणि बीएनवायएस या अभ्यासक्रमांच्या जागांचा तपशील, अंतिम गुणवत्ता यादी, पसंतीक्रम आणि निवड यादीचे स्वतंत्र वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. यापूर्वी गट ‘अ’ साठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना गट ‘ब’ आणि ‘क’ मध्ये सहभागी होण्यासाठी प्रवेश खात्यातून संबंधित सत्रासाठी अर्ज करावा लागेल. या अभ्यासक्रमांसाठी स्वतंत्र शुल्क आकारले जाणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT