Maharashtra Assembly Monsoon Session 2025
मुंबई : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज बुधवारी (दि.२ जुलै) तिसरा दिवस आहे. दरम्यान, आज प्रश्नोत्तराच्या तासावेळी नाला रुंदीकरणाच्या प्रश्नावरुन भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार हे जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्यावर भडकले.
चंद्रपूर शहरातील नाल्यावर चुकीच्या ठिकाणी बांधकाम केल्याचे निदर्शनास आणून देत मुनगंटीवार यांनी, याची चौकशी करुन कारवाई करणार का? असा सवाल केला. त्यावर मंत्री संजय राठोड यांनी, याची चौकशी केली जाणार असल्याचे उत्तर दिले.
या मुद्यावरुन मुनंगटीवार भडकले. ''जी नैसर्गिक नाल्याची रुंदी आहे ती कायम असावी. मंत्री महोदयाकडून अपेक्षित आहे की, नैसगिक नाल्याची जेवढी रुंदी आहे तेवढी राहील याची शासनाने हमी द्यायला हवी. सजेशन फॉर ॲक्शन... म्हणजे हे दादा कोंडकेंचे उत्तर आहे का? असे द्विअर्थी उत्तर देऊ नका,'' असे मुनंगटीवार म्हणाले.
चंद्रपूर शहरातील आकाशवाणी मार्गावरील नाल्यावर चुकीच्या ठिकाणी बांधकाम केल्याचे दिसून येते. याची चौकशी करून कारवाई करणार का? असा सवाल मुनगंटीवार यांनी केला. नाला जेवढा रुंद होता तेवढाच राहील याची काळजी सरकारने घ्यायला हवी, असेही ते म्हणाले.
जिल्हा नियोजन समितीमधून हे काम केले होते. मुख्य भागातून हा नाला जातो. उर्वरित बांधकामाबाबत जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव पाठवतो. तसेच भूमिलेख अभिलेखाकडून याची चौकशी केली जाईल, असे आश्वासन संजय राठोड यांनी दिले.
सोयाबीन खरेदीतील गैरव्यवहार प्रकरणावरही विधानसभेत चर्चा झाली. नाना पटोले यांनी सोयाबीन, धान खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. सोयाबीन, कापूस, धान खरेदीत भ्रष्टाचार आहे. ही योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे. पण मंत्रालयात दलाल बसले आहेत. शेतकऱ्यांच्या नावाने सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारला जात असल्याचा आरोप पटोले यांनी केला. हा प्रश्न आता अधिक गंभीर झाला आहे. त्यामुळे याचा तातडीने निकाल लावणे अत्यावश्यक आहे. या दलालांवर नेमकी काय कारवाई करण्यात येणार आहे, याचे उत्तर द्यावे! असेही ते म्हणाले. त्यावर राज्याचे पणनमंत्री जयकुमार रावल यांनी, सोयाबीन खरेदीवर लक्ष ठेवून चुकीचे काम होईल तिथे कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.