मुंबई: राज्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नोंदी डिजिटल स्वरूपात एकत्रित करण्यासाठी सुरू असलेल्या अपार आयडी (ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्रेशन) निर्मिती प्रक्रियेत राज्यातील ८७.४१ टक्के विद्यार्थ्यांचे अपार तयार झाले आहेत.
राज्यातील २ कोटी १३ लाख ११ हजार ४२९ विद्यार्थ्यांपैकी १ कोटी ८६ लाख २९ हजार १२० विद्यार्थ्यांचे अपार तयार झाले आहेत. मात्र, २५ लाख ४० हजार ७०६ विद्यार्थी अद्याप ‘नॉट अप्लाइड’ श्रेणीत आहेत.
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंतर्गत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाचा डिजिटल मागोवा घेण्यासाठी सुरू करण्यात या प्रक्रियेत राज्याने प्रगती साधली आहे. केंद्र शासनाच्या निर्देशांनुसार मोहीम वेगाने राबविली जात असली तरी अजूनही २५ लाख विद्यार्थी दूर आहेत. अर्ज विविध कारणांमुळे फेल झाल्याने त्यासाठीही शिक्षकांना काम करावे लागणार आहे. जिल्हानिहाय कामगिरीत सिंधुदुर्ग ९६.८५ टक्क्यांसह राज्यात आघाडीवर आहे.
सिंधुदुर्गातील ९१ हजार ४२५ विद्यार्थ्यांपैकी ८८ हजार ५४७ विद्यार्थ्यांचे अपार तयार झाले आहेत. त्यापाठोपाठ रत्नागिरीत ९४.६४ टक्के, गडचिरोलीत ९३.४८ टक्के, भंडाऱ्यात ९३.२३ टक्के आणि गोंदियात ९३.२१ टक्के विद्यार्थ्यांचे अपार तयार झाले आहेत.
अहिल्यानगरमध्ये ९२.६० टक्के, वर्ध्यात ९२.४७ टक्के, साताऱ्यात ९२ टक्के, नाशिकमध्ये ९०.४३ टक्के आणि चंद्रपूरमध्ये ९०.३३ टक्के काम पूर्ण झाले आहे. याउलट मुंबई उपनगर जिल्हा ८०.८० टक्क्यांसह राज्यात सर्वांत मागे आहे.
मुंबई उपनगरातील ६ लाख ८७ हजार ९१ विद्यार्थ्यांपैकी ५ लाख ५५ हजार १६३ विद्यार्थ्यांचे अपार तयार झाले आहेत. मुंबई शहर मध्ये ८८.९४ टक्के, पालघरमध्ये ८६.३८ टक्के, ठाण्यात ८५.७९ टक्के आणि पुण्यात ८५.४४ टक्के विद्यार्थ्यांचे अपार तयार झाले आहेत. त्यामुळे अपार निर्मितीत काही ग्रामीण जिल्ह्यांनी मोठ्या शहरी जिल्ह्यांवर आघाडी घेतल्याचे चित्र आहे.
राज्यात ७१ हजार ५३६ विद्यार्थ्यांच्या अपार निर्मितीसाठी विनंत्या करण्यात आल्या असून, त्यापैकी ७० हजार ६१ प्रकरणे अयशस्वी ठरली आहेत. त्यामुळे अपार निर्मितीची प्रक्रिया पूर्ण करण्याबरोबरच अयशस्वी झालेल्या प्रकरणांची पूर्तता करण्याचेही आव्हान शिक्षण विभागासमोर आहे.