Maharashtra Police Recruitment State Cabinet Approval
मुंबई : महाराष्ट्र पोलिस दलात सुमारे १५ हजार नवीन पोलिस भरतीस मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (दि.१२) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या भरतीमुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम होऊन पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवकांना पोलीस होण्याची संधी मिळणार आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. विविध विभागांच्या प्रस्तावांना मान्यता देत राज्य सरकारने अनेक महत्त्वाच्या योजनांना गती देण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना दिल्या जाणाऱ्या अन्नधान्य वितरण प्रक्रियेत पारदर्शकता व कार्यक्षमतेसाठी हा निर्णय उपयुक्त ठरणार असून, दुकानदारांचे आर्थिक स्थैर्य वाढविण्यास मदत होईल.
सोलापूर–पुणे–मुंबई या हवाई मार्गासाठी Viability Gap Funding निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे या मार्गावरील हवाई प्रवास अधिक सुलभ व किफायतशीर होईल. प्रवासी सुविधेत वाढ होण्याबरोबरच प्रदेशातील व्यापार व पर्यटनालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
या विभागाच्या अखत्यारीतील विविध महामंडळांमार्फत राबविण्यात येणाऱ्या कर्ज योजनांमध्ये जामीनदाराच्या अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. तसेच, शासन हमीची मुदत पाच वर्षांसाठी वाढविण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे पात्र लाभार्थ्यांना कर्जप्राप्ती सोपी होऊन उद्योजकतेस प्रोत्साहन मिळेल.