Maharashtra Padma Awards 2026 pudhari photo
मुंबई

Maharashtra Padma Awards 2026 : मातृदुधाची बँक ते 89 वर्षीय तालभक्त!

विविध क्षेत्रांतील पंधरा मराठी दिग्गजांचा भरीव योगदानाबद्दल पद्म पुरस्काराने सन्मान

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : महाराष्ट्रातील 15 मान्यवरांना 2026 चे प्रतिष्ठित पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यांच्या कार्याचा आणि योगदानाचा थोडक्यात परिचय.

धर्मेंद्र सिंह देओल, (मरणोत्तर, कला, पद्मविभूषण)

बॉलीवूडचे ही मॅन म्हणून ओळखले जाणारे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांनी सहा दशकांहून अधिक काळ भारतीय चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवले. शोले, सत्यकाम, अनुपमा आणि चुपके चुपके यांसारख्या अनेक अजरामर चित्रपटांतून त्यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. ॲक्शन आणि रोमँटिक अशा दोन्ही भूमिकांमध्ये ते तितकेच लोकप्रिय होते. त्यांनी 300 हून अधिक चित्रपटांत काम केले. नुकतेच 24 नोव्हेंबर 2025 रोजी वयाच्या 89 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. कला क्षेत्रातील त्यांच्या अफाट योगदानासाठी त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण देऊन गौरविण्यात आले आहे.

पद्मभूषणचे तीन मानकरी

गायिका अलका याज्ञिक (कला, पद्मभूषण)

भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी पार्श्वगायिकांपैकी एक असलेल्या अलका याज्ञिक यांनी चार दशकांच्या कारकिर्दीत 25 हून अधिक भाषांमध्ये 22 हजारहून अधिक गाणी गायिली आहेत. त्यांना दोन राष्ट्रीय पुरस्कार आणि सात फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. 90 च्या दशकातील जवळपास प्रत्येक हिट गाण्यात त्यांचा आवाज होता. त्यांचे नाव गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवले गेले आहे.

जाहिरातगुरू पीयूष पांडे : (मरणोत्तर, कला/जाहिरात, पद्मभूषण)

भारतीय जाहिरात क्षेत्रात दिग्गज मानले जाणारे पीयूष पांडे यांनी फेविकॉल, कॅडबरी आणि एशियन पेंटस्‌‍सारख्या ब्रँडस्‌‍ना घराघरात पोहोचवले. त्यांनी भारतीय जाहिरातींना अस्सल देशी बाज दिला. 2014 च्या अब की बार मोदी सरकार या मोहिमेचे ते शिल्पकार होते. जाहिरात क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना हा सन्मान जाहीर झाला आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये त्यांचे निधन झाले.

बँकर उदय कोटक (उद्योग, पद्मभूषण)

कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक उदय कोटक यांनी भारतीय बँकिंग क्षेत्रात क्रांती घडवून आणली. एका बिल डिस्काउंटिंग स्टार्टअपपासून त्यांनी देशातील अग्रगण्य खासगी बँक उभी केली. कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि आर्थिक धोरणांमध्ये त्यांचे मोठे योगदान आहे.

पद्मश्री पुरस्काराचे दहा मानकरी

क्रिकेटपटू रोहित शर्मा (क्रीडा, पद्मश्री)

भारतीय क्रिकेट संघाचा यशस्वी कर्णधार आणि सलामीवीर फलंदाज रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने 2024 चा टी-20 विश्वचषक जिंकला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन द्विशतके झळकावणारा तो जगातील एकमेव खेळाडू आहे. त्याच्या क्रिकेटमधील अतुलनीय योगदानासाठी त्याला पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलेे.

अभिनेता आर. माधवन (कला, पद्मश्री)

मॅडी म्हणून चाहत्यांच्या गळ्यातील ताईत असलेला आर. माधवन हा केवळ अभिनेताच नाही तर एक उत्तम चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शकही आहे. रंग दे बसंती, थ्री इडियटस्‌‍ आणि रॉकेटरी : द नंबी इफेक्ट यांसारख्या दर्जेदार चित्रपटांतून त्याने आपली ओळख निर्माण केली. त्याची दिग्दर्शकीय झेप आणि अष्टपैलू अभिनयासाठी त्याला हा पुरस्कार मिळाला आहे. माधवनचे महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूरमध्ये झाले होते.

लोकनाट्य कलाकार रघुवीर खेडकर (कला/तमाशा, पद्मश्री)

रघुवीर खेडकर हे मूळचे अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर मधील. ज्येष्ठ तमाशा सम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचे ते सुपुत्र. त्यांनी महाराष्ट्राची लोककला तमाशा केवळ जिवंत ठेवली नाही तर तिला जागतिक स्तरावर नेले. त्यांच्या लोकनाट्य मंडळाच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक प्रश्नांवर प्रबोधन केले आहे.

डॉ. अर्मिडा फर्नांडिस (वैद्यकीय, पद्मश्री)

मुंबईच्या सायन रुग्णालयाच्या माजी अधिष्ठाता डॉ. अर्मिडा फर्नांडिस यांनी शिशू मृत्यूदर कमी करण्यासाठी ऐतिहासिक कार्य केले आहे. त्यांनी आशियातील पहिली ह्युमन मिल्क बँक (मानवी दूध बँक) स्थापन केली. 1999 मध्ये त्यांनी स्नेहा ही संस्था स्थापन करून झोपडपट्टीतील महिला व बालकांच्या आरोग्यासाठी मोठे काम केले आहे.

श्रीरंग लाड (कृषी, पद्मश्री)

परभणीचे प्रयोगशील शेतकरी श्रीरंग लाड यांनी कृषी क्षेत्रात महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. विशेषतः कापूस पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी त्यांनी विकसित केलेले दादा लाड तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरले आहे. कमी खर्चात जास्त उत्पन्न घेण्याच्या त्यांच्या प्रयोगांमुळे त्यांना हा सन्मान प्राप्त झाला आहे.ते भारतीय किसान संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते असून, लाल कंधारी गाईंच्या संवर्धनासाठीही त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.

उद्योजक अशोक खाडे (उद्योग, पद्मश्री)

एक मजुराचा मुलगा ते एका यशस्वी उद्योजकापर्यंतचा अशोक खाडे यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. मूळचे सांगली जिल्ह्यातील असलेल्या खाडे यांनी स्थापन केलेली डीएएस ऑफशोअर इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आज तेल आणि गॅस क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करत आहे. दलित उद्योजकांसाठी ते एक दीपस्तंभ ठरले आहेत.

जनार्दन बापुराव बोठे (सामाजिक कार्य, पद्मश्री)

जनार्दन बोठे यांनी ग्रामीण महाराष्ट्रात जलसंधारण आणि शिक्षणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांनी पाणी अडवा, पाणी जिरवा या मोहिमेद्वारे अनेक गावांचा पाण्याचा प्रश्न सोडवला आहे.

संशोधक जुझेर वासी (विज्ञान व अभियांत्रिकी, पद्मश्री)

आयआयटी मुंबईचे माजी प्राध्यापक जुझेर वासी यांनी मायक्रो-इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमी-कंडक्टर क्षेत्रात संशोधन केले आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील त्यांच्या कार्यामुळे भारताला वैज्ञानिक प्रगतीत मोठी मदत झाली आहे.

अभिनेते सतीश शहा (मरणोत्तर कला, पद्मश्री)

प्रसिद्ध विनोदी अभिनेते सतीश शहा यांनी चित्रपट आणि टेलिव्हिजनवर आपल्या अभिनयाची छाप पाडली. ये जो है जिंदगी आणि साराभाई व्हर्सेस साराभाई मधील त्यांच्या भूमिका अविस्मरणीय आहेत. त्यांचे नुकतेच निधन झाले असून त्यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे.

उद्योजक सत्यनारायण नवल, (उद्योग, पद्मश्री)

नागपूरचे उद्योजक सत्यनारायण नवल यांनी डिफेन्स एक्सप्लोझिव्ह आणि खाणकाम क्षेत्रात मोठे कार्य केले आहे. सोलर इंडस्ट्रीजच्या माध्यमातून त्यांनी संरक्षण क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर बनवण्यात मदत केली आहे.

छत्तीसगडमधील गोडबोले दाम्पत्याला पद्मश्री

मूळचे पुण्याचे असणाऱ्या आणि गेली 35 वर्षे छत्तीसगडमधील दुर्गम भागात आरोग्य सेवा सुविधा पुरविणाऱ्या डॉ. रामचंद्र गोडबोले आणि डॉ. सुनीता गोडबोले या दाम्पत्याला संयुक्तपणे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. बस्तर आणि अबूझमाडसारख्या अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त भागांत आरोग्य सुविधा पोहोचवण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले आहे. ट्रस्ट फॉर हेल्थच्या माध्यमातून त्यांनी आदिवासी भागात कुपोषण आणि बालमृत्यू दर कमी करण्यासाठी मोठे योगदान दिले. त्यांनी सुमारे एक लाख आदिवासींना मोफत उपचार आणि आरोग्य सेवा पुरवली आहे.

बेळगावच्या डॉ. प्रभाकर कोरे यांचा पद्मश्रीने सन्मान

शिक्षण, साहित्य आणि आरोग्य संशोधनाच्या जागतिक प्रसारात महत्त्वपूर्ण य़ोगदान देणाऱ्या केएलई संस्थेचे माजी कार्याध्यक्ष, माजी खासदार डॉ. प्रभाकर कोरे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. डॉ. कोरे यांनी मागास भागांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यात भूमिका बजावली. केएलई संस्थेच्या माध्यमातून डॉ. कोरे यांनी वैद्यकशास्त्र, आरोग्य संशोधन, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी शिक्षण देणाऱ्या संस्था शैक्षणिक देशभरात तसेच विदेशात स्थापन केल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT