मुंबई: विधान परिषदेच्या जागेसाठी महाविकास आघाडीत एकमेकांचे पाय ओढण्याचे काम सुरू आहे. उद्धव ठाकरेंसाठी विधान परिषदेची जागा सोडू; मात्र बदल्यात राज्यसभेची जागा मिळावी, अशी काँग्रेसची भूमिका आहे.
हा फॉर्म्युला नक्की झाल्यास वर्षभरानंतर राज्यसभा निवडणुकीत आपला पत्ता कट होईल अशी भीती संजय राऊत यांना सतावते आहे. आपल्या खासदारकीची चिंता लागलेले राऊत आता उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाऊ नयेत यासाठी प्रयत्नशील आहेत, असा आरोप भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शुक्रवारी केला.
भाजप प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत नवनाथ बन यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. संजय राऊत यांना काँग्रेस रत्न पुरस्कार देण्यात यावा. कारण राहुल गांधीही काँग्रेसची बाजू मांडत नाहीत, त्यापेक्षा जास्त चांगली बाजू संजय राऊत मांडतात.
काँग्रेसची गुलामी करण्याचे काम संजय राऊत यांच्याकडून केले जातेय. मीठ उद्धव ठाकरे यांचे खायचे आणि चाकरी काँग्रेसची करायची हा संजय राऊत यांचा धंदा झाला आहे. संजय राऊत यांचे प्रगल्भ नेतृत्व मिळाल्यामुळे बुडणाऱ्या काँग्रेसला थोडे अच्छे दिन येतील, अशी टीका बन यांनी केली.
महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री का झाली नाही, देशात भाजपने महिला पंतप्रधान का केले नाही, हे विचारण्याआधी संजय राऊत यांना 2019 साली उद्धव ठाकरे यांच्या ऐवजी रश्मी ठाकरे यांना मुख्यमंत्री का केले नाही, असा प्रश्न बन यांनी केला.
संजय राऊत यांना एवढी चिंता असेल तर पक्षप्रमुख म्हणून आदित्य ठाकरे यांचे नाव घोषित न करता रश्मी ठाकरे यांचे नाव नाव घोषित करणार आहात का, त्यासाठी आग्रह धरणार आहात का, अशा प्रश्नांची सरबत्ती बन यांनी केली.