Madh Island land Issues
मुंबई: ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्या मालाड येथील मढ बेटावरील (आयलँड) बंगल्याला पालिकेकडून बेकायदेशीर बांधकाम केल्याची नोटीस बजावली आहे. असे शंभराहून अधिक बंगले येथे असून आतापर्यंत 30 बांधकामे पाडली आहेत. वैभव ठाकूर (वय 45, सध्या रा. ठाणे) या वाहनचालकाने माहिती अधिकारात दिलेल्या दहा वर्षांच्या लढाईमुळे हे उजेडात आले आहे. दिवसा एका मीडिया हाऊसमध्ये वाहनचालक म्हणून काम करत व रात्री ऑनलाइन सीआरझेड नियम, आरटीआय प्रक्रिया आणि जमीन कायद्यांबद्दल सविस्तर माहिती घेत त्यांनी हा लढा दिला. गेल्या महिन्यात त्यांच्या मालकीच्या भूखंडावरील बंगला अखेर पाडण्यात आला आहे. या कारवाईचे त्यांनी स्वागत केले आहे. मात्र, माझा लढा अजून संपलेला नाही, असे ठाकूर यांनी सांगितले.
ठाकूर याच्या कुटुंबाची मढ बेटावरील एरंगळ गावात जवळपास 2400 चौरस फूट इतकी वडिलोपार्जित जमीन आहे. एप्रिल 2016 मध्ये ठाकूर त्या जागेला भेट देण्यासाठी गेले असता तेथे अनेक अतिक्रमणे दिसून आली. ठाकूर यांना येथे सुरक्षारक्षकांनी प्रवेशही दिला नाही. त्यांच्या जागेत व्यापारी भरत मेहता यांच्या पत्नी रूपा भरत मेहता यांच्या मालकीचा बंगला होता. कोस्टल रेग्युलेशन झोनमध्ये (सीआरझेड) एवढी बांधकामे पाहून त्यांनी या विरोधात लढा हाती घेतला.
1960 पूर्वी या जमिनीवर कोणतेही बांधकाम अस्तित्वात नव्हते, हे प्रथम माहिती अधिकारात उघड केले. त्यानंतर 1960 दशकापूर्वीच्या क्षेत्राचे नकाशे मिळवले. त्यानंतर दखल घेतली जात नसल्याने त्यांनी हा विषय 2022 मध्ये विधानसभेत गाजवला. मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करीत योग्य चौकशी करण्याची मागणी केली. 23 ऑक्टोबर 2024 रोजी, मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि पृथ्वीराज के. चव्हाण यांच्या खंडपीठाने दाखल झालेल्या चार एफआयआरची चौकशी करण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेअंतर्गत विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन झाले. यानंतर मढ बेट आणि आसपासच्या भागातील शंभरहून अधिक बेकायदेशीर बांधकामे समोर आली. बनावट नकाशे असलेल्या भूखंडांची यादी पुढील कारवाईसाठी महापालिकेला सुपूर्द करण्यात आली असून पालिकेने आतापर्यंत 30 अनधिकृत बांधकामे पाडली आहेत.
बीएमसी पी नॉर्थ वॉर्ड अधिकारी कुंदन वळवी यांनी सांगितले, क्राइम ब्रांचने दिलेल्या यादीच्या आधारे आम्ही बेकायदेशीर बंगल्यांना नोटिसा बजावल्या आहेत आणि पाडकामही केले आहे. 101 बंगल्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, तर 28 बांधकामांवर पाडकाम करण्यात आले आहे. अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांना दिलेली नोटीस या कारवाईचा एक भाग होती.
2018 : 1960 च्या दशकापूर्वी या जमिनीवर कोणतेही बांधकाम अस्तित्वात नव्हते, याचे पुरावे मिळवले.
2019 : नकाशात शेतीच्या जमिनीवर बांधकाम उघड झाले.
2020 : बनावट नकाशासाठी जबाबदार एजंट, जमीन मालक आणि सीएसओ कर्मचार्यांविरुद्ध एफआयआर झाला.
2021 : दुसरा एफआयआर बंगल्याचे मालक मेहता यांच्यावर करण्यात आला.
2022 : विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करण्यात झाला. स्वतंत्र समितीची स्थापना करण्यात आली.
2024 : उच्च न्यायालयाने विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे आदेश दिले. एसआयटीने उपअधीक्षक शंभूराज वाबडे आणि उपभूमी अभिलेख अधिकारी मीना पांढरे यांच्यासह 20 हून अधिक जणांना अटक.
गेल्या महिन्यात, आमच्या भूखंडावरील बंगला अखेर पाडण्यात आला. या कारवाईने मी आनंदी आहे. मात्र, माझा लढा अजून संपलेला नाही. बंगला पाडला असला तरी, पाया काढलेला नाही आणि आरोपींनी बाउन्सर ठेवले आहेत जे मला माझ्या स्वतःच्या प्लॉटमध्ये प्रवेश करू देत नाहीत. मी पुन्हा अधिकार्यांशी संपर्क साधेन, असे वैभव ठाकूर यांनी सांगितले.