

Name Navi Mumbai International Airport Loknete D. Ba. Patil
ठाणे : पुढारी वृत्तसेवा
लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासंदर्भातील प्रश्न केंद्र शासनाकडे प्रलंबित असल्याने प्रकल्पग्रस्तांत असंतोष पसरला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत १५ दिवसांत बैठक आयोजित केली जाईल. राज्य शासनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत त्वरित लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करून नाव जाहीर करावे. तसेच नोटिफिकेशन जारी करावे. अन्यथा असंतोषाचा स्फोट होईल, असा इशारा कृती समितीच्या वतीने अध्यक्ष, ज्येष्ठ समाजवादी नेते दशरथ पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला.
लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने अध्यक्ष दशरथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देणे तसेच इतर प्रश्नांबाबत विचारविनिमयासाठी शासकीय विश्रामगृह येथे ठाणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन केले होते. त्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दशरथ पाटील बोलत होते.
केंद्र सरकारच्या हवाई वाहतूक मंत्र्यांबरोबर बैठक घेऊन कृती समितीच्या वतीने या प्रश्नाचा पाठपुरावा केला आहे. आजपर्यंत हा प्रश्न केंद्रात प्रलंबित असल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोष पसरला आहे. याचा स्फोट होऊ न देता केंदाने हा प्रश्न त्वरित सोडवावा, असे दशरथ पाटील म्हणाले. विमानतळ परिसरात नोकऱ्यांचा प्रश्न कसा सोडवायचा त्यात प्रकल्पग्रस्तांना व ठाणे, रायगड, पालघर, मुंबई येथील भुमिपुत्रांना प्राधान्य देऊन नोकरभर्तीसाठीही प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे दशरथ पाटील म्हणाले.
लोकनेते दि. बा. पाटील यांचा स्मृतीदिन २४ जून रोजी आहे. या दिवशी काही भव्य कार्यक्रम आखता येईल का? यावर विचारविनिमय करण्यात आले. यासाठी वेगवेगळ्या भागात कार्यकर्त्यांनी लोकजागृती करत बैठका घ्याव्यात आणि कार्यक्रम यशस्वी करावा असे सांगण्यात आले.