मुलुंड : 26 जानेवारी रोजी विक्रोळी परिसरात प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमांसाठी लावलेले दोन लाऊडस्पीकर पडून एंजल ऊर्फ जानवी राजेश सोनकर या चार वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. टागोर नगरमध्ये सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. स्थानिक रहिवाशांनी तिला तातडीने रुग्णालयात नेले परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलिसांनी अपघाताच्या परिस्थितीचा तपास सुरू केला आहे.
विक्रोळीत प्रजासत्ताक दिन समारंभ आयोजित करणाऱ्या स्थानिक गटाने हे लाऊडस्पीकर लावले होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दोन असणाऱ्या लाऊडस्पीकरना एका वायरने जोडले होते. याचदरम्यान येथून जाणाऱ्या भंगार विक्रेत्याच्या डोक्यावर असलेल्या पोत्याने ही वायर खेचली गेली. त्याबरोबर दोन्ही लाऊडस्पीकरही जमिनीवर येऊ लागले. याचवेळी येथून येणाऱ्या एका चार वर्षांच्या मुलीवर ते कोसळले आणि त्यात ती जखमी झाली. दुर्दैवाने रुग्णालयात पोहोचण्याआधीच तिचा मृत्यू झाला होता. टागोर नगरमध्ये राहणारे मुलीचे कुटुंब परिसरात मोबाईल दुरुस्तीचे दुकान चालवते.
मागील वर्षीप्रमाणे उंचीवर बसवण्याऐवजी यावर्षी स्पीकर्स जमिनीवर ठेवण्यात आले होते. त्यामुळे विक्रोळी पोलिसांनी भारतीय न्याय संहिताच्या कलम 106(1) अंतर्गत प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवला आहे, ज्यामध्ये निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. एफआयआरमध्ये मंडळाचे मालक विनोद परमार, जो स्पीकर्ससाठी जबाबदार होता आणि भंगार विक्रेता सय्यद गुरान यांचे नाव नोंदवण्यात आले आहे.
परमार आणि गुरान दोघांनाही नंतर पोलिस तपासासाठी हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आणि पोलिसांच्या प्रक्रियेनुसार त्यांना प्राथमिक चौकशीनंतर निघून जाण्याची परवानगी देण्यात आली.