मुंबई : मुंबई महापालिकेच्या 426 घरांसाठी सोडत 13 डिसेंबर रोजी निघणार आहे. या सदनिकांसाठी सुमारे 2,157 नागरिकांचे अर्ज आले आहेत. यामुळे आता लॉटरीत कुणाच्या घराचे स्वप्न पूर्ण होते, याकडे लाभार्थ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
महापालिकेच्या 426 सदनिकांची सोडत 20 नोव्हेंबर रोजी काढण्यात येणार होती. मात्र, संगणकीय प्रणालीतील त्रुटी व सोडतीची अपुरी तयारी यामुळे सोडत रद्द करण्यात आली होती. आता 13 डिसेंबरचा मुहूर्त मिळाला असून महापालिका मुख्यालयातील सभागृहात दुपारी तीन वाजता ही सोडत निघणार असल्याची माहिती मालमत्ता विभागातील प्रशासनाने दिली.
विकास नियंत्रण नियमावली 2024 च्या 3 (20) अंतर्गत 240, तर 15 टक्के एकात्मिक योजनेअंतर्गत 186 अशा एकूण 436 घरांसाठी सोडत काढली जाणार आहे. या घरांची विक्री करण्यासाठी महापालिकेने ऑनलाईन अर्ज प्रक्रिया राबविली होती. आतापर्यंत 2,157 लाभार्थ्यांनी अर्ज केले आहेत.