

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई मंडळाच्या 2 हजार 398 घरांचे बांधकाम गोरेगावच्या सिद्धार्थनगर पत्राचाळ येथे नुकतेच सुरू झाले असून लवकरच या घरांची सोडत काढण्यात येणार आहे. बांधकाम पूर्ण होण्यास 4 वर्षांचा कालावधी आवश्यक असून दरम्यानच्या काळात सोडत विजेत्या ग्राहकांना टप्प्याटप्प्याने काही रक्कम भरावी लागणार आहे. यातून इमारतीचा बांधकाम खर्च उभारण्यास म्हाडाला मदत होणार आहे.
सिद्धार्थनगर पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसित सदनिकांचा प्रकल्प म्हाडाने यावर्षी पूर्ण केला. याच प्रकल्पात म्हाडाला आर 1, आर 4, आर 7 आणि आर 13 हे भूखंड उपलब्ध झाले आहेत. या भूखंडांवर बांधण्यात येणार्या घरांची सोडत काढली जाणार आहे. प्रकल्प पूर्ण होण्यास 4 वर्षांचा कालावधी लागणार असून एकूण 1 हजार 700 कोटींचा हा प्रकल्प आहे. त्यापैकी 573 कोटींची तरतूद या वर्षीच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
आतापर्यंत म्हाडाने सर्वसामान्यांसाठी काढलेल्या सोडतीतील बहुतांश घरे सोडतीपूर्वीच तयार असत. काही घरे निर्माणाधीन असली तरी त्यांचे बांधकाम अंतिम टप्प्यात आलेले असे. बांधकाम पूर्ण होऊन, सोडत निघून ताबा दिल्यानंतरच म्हाडाचा बांधकाम खर्च वसूल होत असे. आता मात्र पत्राचाळीतील घरे बांधकामाच्या सुरुवातीच्या टप्प्यापासूनच सोडतीत समाविष्ट केली जाणार आहेत. या वर्षाच्या सुरुवातीलाच या प्रकल्पाचे कार्यादेश निघाले असून नुकतीच बांधकामाला सुरुवात झाली आहे. सर्वसामान्यांच्या सोडतीत केला जाणारा हा पहिलाच प्रयोग आहे. यापूर्वी केवळ आयएएस, आयपीएस अशा विशिष्ट वर्गासाठी उभारल्या जाणार्या प्रकल्पाचेच लाभार्थी निश्चित असत.
म्हाडाच्या मुंबई मंडळाची 5 हजार घरांची सोडत दिवाळीपूर्वी काढणार असल्याचे म्हाडाने जाहीर केले आहे. त्यातच पत्राचाळीतील घरांचा समावेश असणार आहे. सोडत विजेत्यांना विविध टप्पे आखून दिले जातील. त्यानुसार त्यांना घरांच्या विक्री किमतीचा भरणा करता येईल. बांधकामादरम्यान किमान बांधकाम खर्च वसूल होईल अशाप्रकारे हे टप्पे ठरवले जातील. उर्वरित रक्कम घराचा ताबा मिळाल्यानंतर भरता येईल. म्हाडाचे तयार घर सोडतीत लागल्यानंतर आधी 25 टक्के रक्कम भरावी लागते. त्यानंतर दुसर्या टप्प्यात उर्वरित 75 टक्के रक्कम भरली जाते.