Brahmin Community Schemes in Maharashtra
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या ब्राह्मण, आर्य वैश्य आणि राजपूत समाजातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी कर्ज व्याज परतावा योजना जाहीर केली आहे. या समाजासाठी घोषित झालेली ही वैयक्तिक आर्थिक लाभाची पहिली योजना आहे. या तिन्ही योजनांमध्ये प्रत्येकी 50 लाभार्थींना प्रतिवर्षी वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेचा लाभ मिळणार आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विविध समाजाला आकर्षित करण्यासाठी महामंडळे स्थापन करण्याचा सपाटा लावला होता. त्यानुसार ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास, राजपूत समाजासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप तर आर्य वैश्य समाजासाठी श्री वासवी कन्यका आर्थिक महामंडळ स्थापन केले होते.
या महामंडळांना प्रत्येकी 10 कोटी रुपयांचे भागभांडवल देण्यात आले आहे. मात्र, स्थापनेपासून ही तिन्ही महामंडळे कागदावर होती. आता नगरपालिका, नगरपंचायत, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने महामंडळाच्या योजना जाहीर केल्या आहेत. नियोजन विभागाच्या शासन निर्णयानुसार तिन्ही समाज घटकातील बेरोजगार तरुणांना व्यवसाय, उद्योगासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
परतावा लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार
लाभार्थ्याने 15 लाख रूपयांपर्यंतच्या कर्जाचे, व्याजाचे हप्ते वेळेवर भरल्यास बँकेकडे भरलेल्या व्याजाची रक्कम दरमहा महामंडळाकडून लाभार्थ्याच्या खात्यात जमा केली जाईल. व्याज परताव्याची कमाल रक्कम ही साडेचार लाख रुपये इतकी राहील.
तर गट कर्ज व्याज परतावा योजनेत 50 लाखापर्यंत मंजूर झालेल्या कर्जावरील नियमित परतफेड केलेल्या व्याजाचा परतावा दिला जाईल. हा परतावा कमाल 15 लाख रुपयांपर्यंत असेल, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. लाभार्थ्याने 15 दिवसाच्या आत दरमहा हप्ता आणि व्याज भरल्याची माहिती दिली नाही तर त्या हप्त्यातील व्याजाचा परतावा दिला जाणार नाही, असेही शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.