मुंबई : ‘या वयातही मी होणार वकील’...हे वाक्य आता फक्त बोलण्यासाठी नाही, तर प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेतील वास्तव बनले आहे. बारावीनंतर एलएलबी प्रवेशात पुढे वयाची अट नसल्यामुळे 19 वर्षांच्या तरुणांपासून ते 83 वर्षांच्या ज्येष्ठापर्यंत उमेदवारांनी एलएलबीला प्रवेश घेऊन शिक्षणाची सेकंड इनिंग’सुरु केल्याचे दिसत आहे. विविध वयोगटांतील वकीलीतून स्वप्नपूर्तीचा मार्ग बनल्याचे तीन वर्षाच्या आकडेवारीतून समोर आले आहे.
यावर्षी 65 वर्षांचे 26 जणांनी 70 वर्षांचे 9, 77 वर्षांचे 2, तर 83 वर्षांचा 1 विद्यार्थी विधी शिक्षण घेत आहेत. पूर्वी कायद्याचे शिक्षण म्हटले की वकिली घराण्यांतील मुलांचाच त्यात मोठा ओढा असायचा. न्यायालयीन परंपरा, कुटुंबातील वकिलांचा प्रभाव किंवा घरातील चाकोरीतून पुढे आलेली प्रेरणा या सगळ्यामुळे विधी शिक्षण ‘परंपरागत’ मानले जायचे. मात्र काळ बदलला आहे.
आज कायदा शिक्षण ही फक्त कोर्ट-कक्षापुरती मर्यादित करिअर निवड राहिलेली नाही; तर विविध करिअरसाठी आधुनिक, बहुआयामी आणि संधींनी भरलेला अभ्यासक्रम बनला आहे. कायद्याच्या शिक्षणाला वयोमर्यादा नाही; त्यामुळे हे शिक्षण कोणत्याही टप्प्यावर सुरू करता येते. म्हणूनच 19 वयापासून ते तब्बल 83 वर्षांपर्यंतचे विद्यार्थी मागील तीन वर्षांत लॉ-सीईटी देताना दिसत आहेत.
तरुणांचा गट कायमच सर्वाधिक सक्रिय
गेल्या तीन वर्षांच्या प्रवाहावर नजर टाकल्यास 22 ते 25 हा तरुणांचा गट कायमच सर्वाधिक सक्रिय आहेच याचबरोबर 21 ते 35 या विस्तृत वयोगटात वर्षागणिक सातत्याने वाढ होत आहे. सर्वांत उल्लेखनीय बाब म्हणजे 60 वर्षांपलीकडील ज्येष्ठ नागरिक 70 ते 77, अगदी 83 वर्षांपर्यंतही कायदा शिकण्यासाठी प्रवेश घेत आहेत. 40 ते 60 वयोगटातील 8 हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी गेल्या तीन वर्षांत विधी शिक्षणाची नवीन सुरुवात केली आहे. नोकरी, उद्योजकता, समाजकारण, कौटुंबिक जबाबदाऱ्या किंवा कायद्याचे हक्क जाणून घेण्याची गरज या सर्व कारणांनी हा गट विधी शिक्षणातून शिक्षण घेत आहे.