Mumbai Concert Tragedy Pudhari
मुंबई

mumbai concert tragedy: लाईव्ह कॉन्सर्टमध्ये ड्रग्जचा ओव्हरडोस; दोघांचा मृत्यू

goregaon nesco concert: मृतात तरुणीचा समावेश : वरिष्ठ अधिकाऱ्यासह पाच जणांना अटक

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : गोरेगाव येथील नेस्कोमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका लाईव्ह कॉन्सर्टमध्ये मद्यप्राशननासह ड्रग्जचा ओव्हरडेास घेतल्यानंतर एका तरुणीसह दोघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी वनराई पोलिसांनी भारतीय न्याय सहिता आणि एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन आतापर्यंत पाचजणांना अटक केली आहे. त्यात लाईव्ह कॉन्सर्टचा आयोजकासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे या दोघांचा मृत्यू झाल्याने त्याची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत वनराई पोलिसांना तपासाचे आदेश दिले आहेत.

शनिवारी गोरेगाव येथील नेस्कोमध्ये एका लाईव्ह कॉन्सर्टचे आयोजन करण्त आले होते. त्यात मोठ्या संख्येने तरुण-तरुणी सामिल झाले होते. कार्यक्रम सुरु असताना काही तरुणांनी मद्यप्राशन केले होते. त्यातच त्यांनी एमडी या ड्रग्जचा अतिसेवन केले होते. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यांना तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल कणयात आले होते. त्यात दोन तरुणांचा मृत्यू झाला.

ही माहिती प्राप्त होताच वनराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. प्राथमिक तपासात मृत तरुणांनी मद्यप्राशनासह ड्रग्जचा ओव्हरडोस घेतल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे त्याचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. त्यांच्या रिपोर्टनंतर त्यांनी ड्रग्जचे सेवन केले होते का याचा खुलासा होणार आहे.

या घटनेनंतर लाईव्ह कॉन्सर्टच्या आयोजकासह इतराविरुद्ध वनराई पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर आयोजकासह इतर पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. सनी जैन, बाळकृष्ण कुरूप, रौनक खंडेवाल, आनंद पटेल, प्रतीक पांडे, आकाश समल अशी या आरोपींची नावे आहेत. सर्वांना 16 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

एमबीएचे विद्यार्थी

अमली पदार्थाच्या अतिसेवनामुळे जीव गमावणारे दोघे विद्यार्थी हे दक्षिण मुंबईतल्या नामांकित एमबीए कॉलेजचे विद्यार्थी होते. 11 एप्रिलरोजी गोरेगावात कॉलेजमधील 15 विद्यार्थी या कॉन्सर्टला उपस्थित होते. यातील मृत्यू झालेल्या दोघांनी कॉन्सर्टला जाण्यापूर्वीच अमली पदार्थाची गोळी घेतली होती. यानंतर कॉन्सर्टमध्ये त्यांनी मद्यपानही केले होते. सुमारे तीन ते चार हजार तरुण या कॉन्सर्टला जमले होते.

कॉन्सर्टमध्येच अस्वस्थ वाटू लागले

अमली पदार्थ आणि मद्यपान याचं एकत्रित सेवन केल्यानंतर कॉन्सर्टदरम्यानच काही मुलांना अस्वस्थ वाटत होते, असे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. यातील एका तरुणाचा रविवारी पहाटे तर तरुणीचा रविवारी दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर आणखी एक जण अत्यवस्थ होता. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT