Mumbai Crime pudhari photo
मुंबई

Mumbai Crime : लालबागच्या गणेशोत्सवात दागिने, रोकड, मोबाईलवर डल्ला; इंदूरच्या दोघांना अटक

दर्शनाच्या रांगेतील गर्दीचा फायदा घेत चोरीचा डाव

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : लालबाग गणेशोत्सवातील दर्शनाच्या रांगेतील प्रचंड गर्दीचा फायदा घेत भाविकांना लक्ष्य करणाऱ्या दोघांना काळाचौकी पोलिसांनी अटक केली आहे. आरिफ साकसेनसिंह गुजर (२४) आणि सोमनाथ सामानसिंह राठोड (२३), दोघेही रा. इंदूर, मध्य प्रदेश, अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

सुरक्षारक्षकाचा मोबाईल आणि रोकड चोरून पळण्याच्या प्रयत्नात असताना भाविकांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले. प्राथमिक तपासात हे दोघे चोरीच्या उद्देशाने मध्य प्रदेशातून मुंबईत आल्याचे समोर आले असून, त्यांच्या मागे आणखी कोणी आहे का, तसेच गणेशोत्सवातील अन्य चोरीच्या घटनांशी त्यांचा संबंध आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

१४ सप्टेंबर रोजी लालबाग परिसरात चोरीच्या अनेक घटना घडल्या. लालबाग येथील रहिवासी वर्षा भोपळे (६७) या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील कुबल मसाल्याजवळ दर्शनाच्या रांगेत उभ्या होत्या. सकाळी सुमारे ११ वाजता गर्दीत साडी नीट करताना त्यांच्या गळ्यातील १० ग्रॅम वजनाचे सुमारे ७० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. शोध घेऊनही दागिना न सापडल्याने त्यांनी काळाचौकी पोलिस ठाण्यात तक्रार केली.

याच दर्शनाच्या रांगेत सायन-कोळीवाडा येथील धनंजय विष्णू बाळसराफ (४९) यांच्या गळ्यातील सुमारे ९० हजार रुपये किमतीची सोनसाखळी चोरीला गेली. त्यांनीही पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

दरम्यान, दुपारी सुमारे १.३० वाजता मालाड येथे सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारे मायकेल नाडर (२८) दर्शनाच्या रांगेत उभे होते. त्यावेळी त्यांच्या खिशातील २५ हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि २,३०० रुपये रोख, असा एकूण २७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला. चोरी लक्षात येताच नाडर यांनी आरडाओरड केली. दोन्ही संशयित पळून जात असताना भाविकांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले. जमावाने त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली असता, गस्तीवर असलेल्या साध्या वेशातील काळाचौकी पोलिसांनी हस्तक्षेप करून दोघांना ताब्यात घेतले.

  • लालबाग परिसरात गणेशोत्सवाच्या काळात मोठी गर्दी होत असल्याने भाविकांनी दागिने, मोबाईल, पाकीट आणि रोकड सुरक्षित ठेवावी, असे आवाहन काळाचौकी पोलिसांनी केले आहे. संशयास्पद हालचाल आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. अटक केलेल्या दोघांचा अन्य चोरीच्या घटनांशी संबंध आहे का आणि त्यांच्या टोळीत आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT