Lalbagh child begging silver paint case
मुंबई, पुढारी वृत्तसेवा: सणासुदीच्या गर्दीचा फायदा घेऊन सध्या भीक मागण्याचा एक नवा प्रकार समोर आला आहे. लहान मुलांच्या संपूर्ण अंगाला सिल्वर रंग लावून त्यांना पुतळ्यासारखं उभं करून भीक मागवायला लावल्याचा धक्कादायक प्रकार सुरू झाला असून, या विरोधात महाराष्ट्रातील पहिली कारवाई लालबागमध्ये करण्यात आली आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एक महिला दोन लहान मुलांना घेऊन उभी होती. दोन्ही मुलांच्या संपूर्ण अंगाला सिल्वर रंग लावून वेशभूषा केलेली होती आणि ती महिला गणपती पाहण्यासाठी आलेल्या भाविकांकडे त्यांना दाखवून भीक मागत होती.
या प्रकारची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले. तिला काळाचौकी पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली. सखुबाई बापू काळे (वय ६५, व्यवसाय नाही, रा. पारधी गल्ली, भूम, उस्मानाबाद) असे तिचे नाव आहे. तिच्यासोबत असणारी दोन मुले ही तिची नातवंडे असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
अल्पवयीन मुलांच्या अंगाला सिल्वर रंग लावून त्यांना भीक मागण्यासाठी वापरल्याप्रकरणी तिच्याविरोधात काळाचौकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या गर्दीत भाविकांच्या करुणेचा गैरफायदा घेणाऱ्या या नव्या भीक मागण्याच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी पोलिसांनी ही कारवाई केली असून, अशा प्रकारे मुलांचा वापर करून भीक मागणे हा बालकामगार कायदा आणि भिक्षावृत्ती प्रतिबंधक कायद्यांतर्गत गंभीर गुन्हा आहे.