Diwali 2025 Pudhari
मुंबई

Diwali 2025: यंदा दिवाळी सात दिवसाची; वसुबारस ते भाऊबीज... तारीख, मुहूर्त संपूर्ण माहिती एका क्लिकवर

Da Kru Soman Panchang: पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

Diwali 2025 when is diwali padwa laxmi pujan narak chaturdashi bhaubeej date

ठाणे : यंदा दिवाळीत लक्ष्मी-कुबेरपूजन शास्त्र नियमाप्रमाणे मंगळवार, 21 ऑक्टोबर रोजी करावे, असे आवाहन पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी केले आहे. याविषयी अधिक माहिती देताना सोमण म्हणाले की, धर्मसिंधू, पुरुषार्थ चिंतामणी, तिथीनिर्णय इत्यादी ग्रंथात म्हटल्याप्रमाणे पूर्व दिवशी प्रदोषव्याप्ती असून दुसरे दिवशी तीन प्रहरांपेक्षा अधिक अमावास्या व्याप्ती असेल आणि अमावास्येपेक्षा प्रतिपदा अधिक काल असल्यास लक्ष्मीपूजन दुसरे दिवशी म्हणजे अमावास्येच्याच दिवशी करावे, असे म्हटले आहे. त्याप्रमाणे यंदाच्या दिवाळीत मंगळवार 21 ऑक्टोबर रोजीच लक्ष्मी-कुबेरपूजन करण्यात यावे.

दिवाळीतील प्रत्येक दिवसाची माहिती आणि मुहूर्त...

1. वसुबारस

शुक्रवार 17 ऑक्टोबर रोजी प्रदोषकाली आश्विन कृष्ण द्वादशी असल्याने या दिवशी गोवत्स द्वादशी, वसुबारस साजरी करावयाची आहे. या दिवशी सूर्यास्तानंतर गाय आणि वासरू यांची पूजा करून गोड पदार्थाचा नैवेद्य खायला द्यायचा आहे. भारतीय संस्कृती ही शेतीप्रधान संस्कृती असल्याने आपण दीपावलीचा आनंदोत्सव साजरा करण्याअगोदर गाय-वासराची पूजा करून त्यांच्याविषयी आदर प्रकट करीत असतो.

2. धनत्रयोदशी

शनिवार, 18 ऑक्टोबरला प्रदोषकाली आश्विन कृष्ण त्रयोदशी असल्याने या दिवशी धनत्रयोदशी आहे. याच दिवशी धन्वंतरीपूजन करावयाचे आहे. या दिवशी गरिबांना दीपदान, वस्त्रदान आणि अन्नदान करावयाचे आहे. गरिबांना दीपावलीचा सण आनंदाने साजरा करता यावा हा यामागचा उद्देश आहे. या दिवशी सकाळी 8.02 ते 9.29 शुभ, दुपारी 12.23 ते 1.50 चल, दुपारी 1.51 ते 3.17 लाभ आणि दुपारी 3.18 ते 4.44 अमृत चौघडीमध्ये व्यापारी हिशेबाच्या वह्या आणाव्यात.

3. रविवार, 19 ऑक्टोबर रोजी दिवाळीचा कोणताही सण नाही.

4. नरकचतुर्दशी कधी आहे?

सोमवार 20 ऑक्टोबर रोजी चंद्रोदयाच्या वेळी आश्विन कृष्ण चतुर्दशी असल्याने याच दिवशी नरकचतुर्दशीचा सण साजरा करावयाचा आहे. या दिवशी चंद्रोदय पहाटे 5.20 वाजता आहे, सूर्योदय सकाळी 6.35 वाजता आहे. या दिवशी चंद्रोदयापासून सूर्योदयापर्यंत अभ्यंगस्नान करण्यास सांगितलेले आहे. सुगंधी तेलाने, उटण लावून मसाज करावा. नंतर उष्णोदक पाण्याने स्नान करावे.

5. लक्ष्मीपूजन तारीख आणि वेळ काय?

मंगळवार, 21 ऑक्टोबर रोजी सायं. 6.11 ते रात्री 8.40 या प्रदोषकालात लक्ष्मी-कुबेरपूजन करावयाचे आहे. या दिवशी अभ्यंगस्नान आणि अलक्ष्मी नि:स्सारण करायचे आहे. झाडूची पूजाही करावयाची आहे. याच दिवशी श्री महावीर निर्वाण दिवस आहे.

6. दिवाळी पाडवा कधी आहे?

बुधवार, 22 ऑक्टोबर रोजी कार्तिक शुक्ल प्रतिपदा, बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा सण आहे. हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक दिवस आहे. या दिवशी मौल्यवान वस्तूची खरेदी करतात. तसेच शुभ कार्याचा प्रारंभ करतात. या दिवशी पत्नी पतीला ओवाळते आणि पती पत्नीला भेटवस्तू देतो. या दिवशी विक्रम संवत् 2082 पिंगलनाम संवत्सराचा प्रारंभ होत आहे. याच दिवशी महावीर जैन संवत् 2552 चा प्रारंभ होत आहे. याच दिवशी अन्नकूट आणि गोवर्धन पूजा करावयाची आहे. या दिवशी सकाळी 6.36 ते 8.03 लाभ, सकाळी 8.04 ते 9.30 अमृत, सकाळी 11.57 ते दुपारी 12.24 शुभ, दुपारी 3.18 ते सायं. 4.45 चल आणि सायं. 4.45 ते 6.10 लाभ चौघडीमध्ये वहीपूजन, वहीलेखन करावयास उत्तम मुहूर्त.

7. भाऊबीज कधी आहे?

गुरुवार, 23 ऑक्टोबर या दिवशी यमद्वितीया, भाऊबीज सण आहे. बंधू-भगिनीचे प्रेम जिव्हाळा वृद्धिंगत करणारा हा सण असतो. या दिवशी भाऊ बहिणीच्या घरी जातो. बहीण त्याला ओवाळते,भाऊ तिला भेटवस्तू देतो. भाऊबीजेच्या सणाने दिवाळीचा उत्सव संपन्न होत असतो.

पर्यावरणाचे भान ठेवून दिवाळी साजरी करा

दिवाळीचा सण आपण साजरा करतो. अज्ञान, आळस, अस्वच्छता, अंधश्रद्धा, अनीती यांचा अंधार दूर होऊन ज्ञान , उद्योगीपणा, स्वच्छता, वैज्ञानिक दृष्टिकोन, नीती यांचा प्रकाश सर्वत्र पसरो, अशी आपण प्रार्थना करूया. तसेच हा दीपावलीचा सण साजरा करता पर्यावरणाचे भान ठेवून आपण इकोफ्रेन्डली दिवाळी उत्सव साजरा करूया, असेही दा. कृ. सोमण यांनी म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT