लाडकी बहीण योजनेमुळे विकासकामांना निधी मिळायला उशीर होत असल्याचे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे Pudhari News Network
मुंबई

Ladki Bahin Yojna : निधीच्या विलंबाचे खापर लाडक्या बहिणींवर

Mumbai News : अर्थखाते वाहणार्‍या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्याच विधानांमुळे चर्चांना उधाण

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : लाडकी बहीण योजनेमुळे विकासकामांना निधी मिळायला उशीर होत असल्याचे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे, तर या योजनेमुळे इतर योजनांना पैसे येण्यास उशीर होत असल्याचे सांगत मंत्री छगन भुजबळ यांनी भरणेंच्या विधानाची री ओढली आहे.

लोकसभा निवडणुकीत अनपेक्षित फटका खाणार्‍या महायुतीला लाडकी बहीण योजनेमुळे विधानसभेत अभूतपूर्व यश मिळाल्याचे सांगितले जाते. आर्थिक बोजा पडत असला तरी योजना बंद होणार नसल्याचा दावा महायुतीचे मंत्री करत असतात. दुसरीकडे या योजनेमुळे विकासकामांना निधी मिळण्यास विलंब होत असल्याची कुरकुर महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांच्या पक्षाचे मंत्रीच करू लागले आहेत. दत्तात्रय भरणे यांनी शनिवारी एका कार्यक्रमात बोलताना, मी इंदापूर तालुक्यातील सर्व विभागांना जास्त निधी आणण्याचा प्रयत्न करत असतो. आज लाडक्या बहिणींमुळे निधी यायला थोडा उशीर होतोय. थोडा उशीर झाला. पण गाडी हळूहळू पूर्ववत यायला लागली आहे, असे विधान केले.

दुसरीकडे भरणे यांच्या विधानाने वाद सुरू झाला असतानाच मंत्री छगन भुजबळ यांनीही तशीच भूमिका मांडली. यात लपवण्यासारखे काही नाही. स्वाभाविक आहे. घरी अचानक एक मोठा खर्च निघाला तर काय स्थिती होते.

‘लाडकी बहीण’मुळे शिवभोजन थाळीला उशीर

लाडकी बहीण योजनेसाठी 45 हजार कोटी बाजूला काढायचे आहेत. त्यामुळे इतर गोष्टींना ताण सहन करावा लागेल. ‘लाडकी बहीण’मुळे शिवभोजन थाळी योजनेच्या पैशांना देखील उशीर होत आहे. पैसे कुठेही जाणार नाहीत. सर्वांना ते मिळणार आहेत. प्रथम कशाला प्राधान्य द्यायचे हे सरकारने ठरवायचे असते, असे भुजबळ यांनी भरणे यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT