मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्वच महिला लाभार्थ्यांना ई-केवायसी बंधनकारक केली आहे. यासाठी सरकारने एक खास पोर्टल तयार केले. लाभार्थी महिलांना या पोर्टलवर जाऊन आपली ई-केवायसी दोन महिन्यांच्या आत पूर्ण करायची आहे. ज्या महिला ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करतील त्यांनाच या योजनेसह सरकारच्या सर्वच योजनांचा लाभ मिळेल, असे शासनाने स्पष्ट केले आहे.
राज्याच्या महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे यांनी एका ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. त्यांनी ई-केवायसीची माहिती देताना सांगितले आहे की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी भगिनींसाठी https://ladakibahin.maharashtra.gov.in या वेब पोर्टलवर ई-केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. योजनेच्या सर्व लाभार्थी भगिनींनी पुढील 2 महिन्यांच्या आत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी. ही प्रक्रिया अतिशय सहज, सोपी व सुलभ असून, योजनेमध्ये पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी, पात्र लाभार्थ्यांना नियमित लाभ मिळण्यासाठी सर्वांनी ही प्रक्रिया पूर्ण करावी. ही प्रक्रिया आपल्याला भविष्यातील इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठीही उपयुक्त ठरणार आहे, असे त्यांनी सांगितले आहे.
पोर्टलवर येतोय एरर
लाडक्या बहिणींसाठी ई-केवायसीची घोषणा महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी केली. त्यानंतर अनेक लाडक्या बहिणींनी ई-केवायसी करण्याचे प्रयत्न केले. मात्र, संबंधित पोर्टलवर एरर येत आहे. ई-केवायसी करण्यासाठी आधार प्रमाणीकरणासाठी संमती मागितली जाते. मात्र, येथेच एरर येत आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांना अडचण होत आहे.
कशी करायची ई-केवायसी?
ई-केवायसीसाठी https://ladakibahin.maharashtra.gov.in या पोर्टलवर जावे लागेल.
वरील पोर्टलवर गेल्यानंतर महिलांना प्रथम आपला आधार क्रमांक टाकावा लागेल.
आधार क्रमांकानंतर खाली दिलेला कॅप्चा टाकावा. त्यानंतर खालील सूचना वाचून ओके बटनावर क्लिक करावे.
त्यानंतर आधारवरून आलेला 6 अंकी ओटीपी प्रविष्ट करावा लागेल.
हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर महिलांना त्यांच्या पतीचा किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकावा लागेल.
आधार क्रमांकानंतर खाली दिलेला कॅप्चा टाकावा. त्यानंतर खालील सूचना वाचून ओकेच्या बटनावर क्लिक करावे.
त्यानंतर आधारवरून आलेला 6 अंकी ओटीपी कोड प्रविष्ट करावा.
अखेरच्या टप्प्यात कुटुंबप्रमुखाला 1) माझ्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीस नाही किंवा निवृत्ती वेतनाचा लाभ घेत नाही, 2) माझ्या कुटुंबातील एक विवाहित व एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे, या प्रश्नांची होय किंवा नाही अशा स्वरूपात उत्तरे द्यावी लागतील. त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करावे. अशाप्रकारे तुमची ई-केवायसी पूर्ण होईल.