Police Pudhari
मुंबई

Kurla Narcotics Trade: कुर्ला परिसर ड्रग्ज माफियांच्या विळख्यात; पोलिसांचे दुर्लक्ष?

तरुणाई नशेच्या गर्तेत; तक्रारींनंतरही कारवाईचा पत्ता नाही

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: कुर्ला पोलीस ठाणे आणि विनोबा भावे नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थांचा कथित खुलेआम व्यापार सुरू असून, ड्रग्ज माफियांनी संपूर्ण परिसरात आपले जाळे पसरवल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते ॲड. कमलेश हडकर यांनी केला आहे.

अंमली पदार्थ विक्रीची ठिकाणे आणि संबंधित व्यक्तींची नावे पोलिसांना वारंवार देऊनही गेल्या दोन वर्षांत कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे कुर्ल्यातील तरुण पिढी नशेच्या विळख्यात सापडत असताना पोलीस यंत्रणा नेमकी कोणाची वाट पाहत आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.

कुर्ला पश्चिमेतील उर्दू बाग लेन, मायकल कंपाउंड, उनवाला कंपाउंड, बाबू कसाई गल्ली, रेल्वे पटरी परिसर, राम बच्चन तबेला सी ब्लॉक, एलआयजी व एमआयजी कॉलनी, ब्राह्मणवाडी, कुर्ला नर्सिंग होमजवळील पार्किंग, अर्पण हॉस्पिटलसमोरील परिसर, स. गो. बर्वे मार्ग, न्यू मॉडेल सिनेमा ट्रान्झिट कॅम्प, बुद्ध कॉलनी, बालाजी मंदिर गल्ली, पाइप रोड, भारती नगर, कोहिनूर सिटी परिसर, गावदेवी मंदिर, वाडिया इस्टेट, क्रांती नगर, हालाव पूल, ख्रिश्चन गाव आणि इंदिरा नगर आदी भागांत अंमली पदार्थांची विक्री होत असल्याचा आरोप हडकर यांनी केला आहे.

बाहेरील भागांतूनही नशेखोर खरेदीसाठी येत असल्याचा दावा त्यांनी केला. अल्पवयीन मुलांना पैशांचे आमिष दाखवून ड्रग्ज विक्रीसाठी वापरले जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. व्यसनासाठी पैसे मिळविण्याच्या प्रयत्नात काही तरुण गुन्हेगारीकडे वळत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

ड्रग्ज माफियांकडून दिल्या जातात धमक्या

ड्रग्जच्या कथित व्यापाराबरोबरच नशेमन हॉटेलजवळ, तकिया वार्ड, बुद्ध कॉलनी, वाडिया इस्टेट, ख्रिश्चन गाव आणि क्रांती नगर परिसरात मटका व्यवसाय तसेच पत्त्यांचे क्लब सुरू असल्याचा आरोप हडकर यांनी केला आहे.

या कथित गैरप्रकारांची माहिती पोलिसांना देऊनही कारवाई होत नसल्याने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दरम्यान, तक्रारी केल्यामुळे ड्रग्ज माफियांकडून धमक्या देण्यात आल्या आणि आपल्यावर शारीरिक हल्लाही झाल्याचा गंभीर दावा हडकर यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT