हेच उघडे मॅनहोल असलम शेख यांच्या मृत्यूचे कारण बनले आणि पावसाळ्यात मोठा धोका देणारे सर्व मॅनहोल्स पुन्हा चर्चेत आले.  pudhari photo
मुंबई

Open Manhole Death : मॅनहोलमध्ये पडून एका मुंबईकराचा मृत्यू

साकीनाक्यातील दुर्घटना : सहाय्यक आयुक्तांसह चारजण तडकाफडकी निलंबित

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे कुर्ला साकीनाका येथील खैरानी मार्गावरील उघड्या मॅनहोलमध्ये पडून बुधवारी ५५ वर्षीय असलम इसाक शेख यांचा मृत्यू झाला. दुरुस्तीचे काम सुरू असताना हे मॅनहोल उघडे ठेवले गेले, तिथे कोणतीही खबरदारीची सूचना लावली नाही आणि त्याच रस्त्याने मोबाईल बोलत बोलत चाललेले असलम शेख सरळ मॅनहोलमध्ये पडले.

सायन गांधी मार्केट परिसरात तुंबईची पाहणी करताना, दोन आठवड्यापूर्वीच महापौर रितू तावडे यांच्या डोळ्यादेखत एक पालिका कर्मचारी उघड्या मॅनहोलमध्ये पडला होता. त्या प्रकाराची चौकशी सुरू असतानाच बुधवारी साकीनाक्यात असलम शेख यांना जीव गमवावा लागला.

या घटनेची गंभीर दखल घेत मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी तातडीने कुर्ला एल विभागाच्या सहाय्यक आयुक्त धनाजी हेर्लेकर यांच्यासह चार जणांना तातडीने निलंबित केले. सहायक व दुय्यम अभियंता दीपक चौगुले, कनिष्ठ अभियंता (परिरक्षण) अभिजीत चौगुले, सहायक अभियंता (मलनिस्सारण प्रचालन) उत्तम पाटील यांनाही तडकाफडकी निलंबित करण्यात आले असून, त्यांची खातेनिहाय चौकशी जाहीर करण्यात आली आहे. सुरक्षेच्या नियमांबाबत कामात हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित कंत्राटदारास काळ्या यादीत टाकण्याचेही आदेश आयुक्तांनी दिले आहेत. पुन्हा असे प्रसंग ओढवू नयेत म्हणून अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी गठीत करण्यात आली आहे.

नेमके काय घडले?

साकीनाक्यात खैरानी मार्गालगत मलनिस्सारण प्रचालन खात्यामार्फत मेनहोलवर संरक्षक जाळी' बसवण्याचे काम सुरू होते. मात्र ते करताना कंत्राटदराने सुरक्षिततेची कोणतीही काळजी घेतली नसल्याचे सकृत दर्शनी दिसून आले. काम सुरू असलेल्या रस्त्यावरून असलम इसाक शेख हे मोबाईलवर बोलत पायी जात होते. शेख मॅनहोलजवळ आले. त्यावेळी तेथे उभ्या व्यक्तींनी त्यांना आवाज देऊन थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुर्दैवाने शेख यांचा तोल जाऊन ते 'मॅनहोल' मध्ये पडले. मुंबई महानगरपालिका, मुंबई अग्निशमन दल आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. शिडी आत सरकवून शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेख यांच्या चपला आणि छत्री तेवढी हाती आली. नंतर शेख यांचा मृतदेह दूरवर ड्रेनेज लाईनमध्ये सापडला.

विधानसभेत पडसाद

या घटनेचे पडसाद बुधवारी विधानसभेतही उमटले. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी या दुर्घटनेकडे सभागृहाचे लक्ष वेधले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही या दुर्घटनेवर नाराजी व्‍यक्त केली. अशा निष्काळजी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा, असे सांगत अध्यक्षांनी सरकारला निवेदन करण्याचे आदेश दिलेे. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनीही विधानसभेत निवेदनाद्वारे या निलंबनाची कारवाई जाहीर केली. अस्लम इसाक शेख यांच्या कुटुंबीयांना महानगरपालिकेच्या वतीने १० लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य जाहीर करण्यात आल्याचे राज्यमंत्र्यांनी सांगितले.

मुंबईत १ लाख २० हजार मॅनहोल

पालिकेचा पर्जन्यजलवाहिन्या व मलनि:स्सारण विभागाची शहर आणि उपनगरात विविध ठिकाणी १ लाख २० हजारापेक्षा जास्त मॅनहोल आहेत. त्यापैकी शहरात ३० हजार तर पूर्व-पश्चिम उपनगरात सुमारे ९० हजारांहून अधिक मॅनहोल आहेत.

मॅनहोल्सच्या पाहणीचे आदेश

मुंबईतील सर्व मॅनहोलची आठ दिवसांत पाहणी करून त्यांच्या सुरक्षितेची खात्री करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मॅनहोलची कामे करताना चारही बाजूंनी सुरक्षारोधक लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT