Police File Photo
मुंबई

Kurla Police Combing Operation: कुर्ल्यात मध्यरात्री पोलिसांचे मोठे कोंबिंग ऑपरेशन; तलवारींसह शस्त्रसाठा जप्त

माकडवाला कंपाउंडमध्ये १५० पोलिसांचा फौजफाटा; २५ ते ३० घरांची झडती, शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी पाच गुन्हे दाखल.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: कुर्ला पश्चिम येथील माकडवाला कंपाउंड परिसरात वाढत्या गुन्हेगारी कारवाया आणि वारंवार घडणाऱ्या हिंसक घटनांना आळा घालण्यासाठी विनोबा भावे नगर पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री मोठे कोंबिंग ऑपरेशन राबवले.

सुमारे १५० पोलिसांचा फौजफाटा, दहा पथके आणि २५ ते ३० घरांची झडती, अशा व्यापक स्वरूपाच्या या मोहिमेत तलवारी, चॉपर, कोयते आणि सुरे असा घातक शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.

शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी पाच स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. याचवेळी विनोद पवार हत्या प्रकरणात आणखी तिघांना अटक करण्यात आली.

कुर्ला पश्चिममधील माकडवाला कंपाउंड हा सुमारे तीन एकर परिसरात पसरलेला दाट लोकवस्तीचा भाग आहे. या परिसरातील काही कुटुंबांमध्ये वडिलोपार्जित मालमत्तेचे वाद, आर्थिक व्यवहार आणि परिसरातील सामाजिक वर्चस्व यावरून निर्माण होणारे संघर्ष अनेकदा हिंसक स्वरूप धारण करतात.

सुरुवातीला किरकोळ कारणांवरून होणारी भांडणे पुढे मारहाण, प्राणघातक हल्ले आणि हत्यांपर्यंत पोहोचत असल्याचे चित्र आहे. गेल्या दशकभरात या परिसरात चार जणांची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे.

विनोबा भावे नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमित ताड यांना माकडवाला कंपाउंडमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या शस्त्रांचा वापर परिसरातील वाद आणि गुन्हेगारी कारवायांमध्ये होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहिमेचे नियोजन केले.

त्यानुसार परिमंडळ सातमधील विविध पोलीस ठाण्यांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची दहा पथके तयार करण्यात आली. या मोहिमेसाठी सुमारे १५० पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. गुरुवारी मध्यरात्री पोलिसांनी संपूर्ण माकडवाला कंपाउंड परिसराला वेढा घातला. अचानक झालेल्या या कारवाईमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये एकच खळबळ उडाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT