मुंबई: कुर्ला येथील फिनिक्स मॉलजवळील प्रमोद महाजन उद्यानात जोडप्याला मारहाण करून त्यांच्याशी गैरवर्तन केल्याच्या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुंबई महापालिकेने आता संबंधित मदरशाच्या बांधकामाची तपासणी करण्याची तयारी सुरू केली आहे.
उद्यानाच्या देखभालीतील निष्काळजीपणाबद्दल कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस बजावून एक लाख रुपयांचा दंड ठोठावल्यानंतर आता एल विभाग कार्यालयाने मदरशालाही नोटीस बजावली आहे.
या प्रकरणात आठ अल्पवयीन मुले संबंधित मदरशातून आल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर मदरशाच्या बांधकामाची वैधता आणि तेथे सुरू असलेल्या गतिविधींबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एल विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाने सोमवारी संबंधित परिसराच्या मालक, कब्जाधारक अथवा भाडेकरूला नोटीस बजावली आहे.
नोटिशीनुसार, २५ नोव्हेंबर २०२६ किंवा त्यानंतर कोणत्याही कामकाजाच्या दिवशी महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी परिसरात प्रवेश करून बांधकामाची पाहणी तसेच मोजमाप करणार आहेत. उद्यानाच्या मागील बाजूस गुरु गोविंद सिंह मार्ग आणि गैबन शाह दर्गा रोड परिसरात हे मदरसे असल्याचे सांगण्यात येते. तपासणीसाठी महापालिका अधिकाऱ्यांना आवश्यक सहकार्य करण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे, बांधकामाची वैधता तपासण्यासाठी मूळ मंजूर बांधकाम नकाशा, भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) आणि बांधकाम परवानगीशी संबंधित कागदपत्रे तयार ठेवण्यास सांगण्यात आले आहे. तसेच पाहणीदरम्यान कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी घाटकोपर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनाही नोटिशीची प्रत पाठविण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस बंदोबस्तात ही तपासणी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी संबंधित मदरसा अनधिकृतपणे चालवला जात असल्याचा आरोप केला असून, महापालिकेने त्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आता महापालिकेच्या प्रत्यक्ष पाहणीत बांधकाम मंजूर नकाशानुसार आहे की नाही, हे स्पष्ट होणार असून, तपासणी अहवालानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.