मुंबई : मुंबई महापालिकेच्या 26 विभागांपैकी कुर्ला एल विभागात सर्वाधिक 78 हजार 825 दुबार व अनेक नावे असलेले मतदार आढळून आले आहेत. तर सर्वात कमी 8,398 दुबार मतदार डोंगरी पायधुनी बी विभागात आढळून आले आहेत.
महापालिकेने या दुबार मतदारांना एकापेक्षा जास्त मतदानापासून दूर ठेवण्यासाठी विशेष मोहिम हाती घेतली आहे. यासाठी पालिकेच्या 26 विभाग कार्यालयीनिहाय दुपार व त्यापेक्षा जास्त वेळा नाव नोंदवलेल्या मतदारांची यादी तयार केली आहे. या यादीनुसार महापालिकेचे बूथ अधिकारी दुबार नाव नोंदवलेल्या नागरिकांच्या घरापर्यंत पोहचले आहेत.
पालिकेच्या कुर्ला एल विभागातील 16 प्रभागांमध्ये 78 हजार 825 दुबार नावे आढळून आल्यामुळे येथील बूथ अधिकाऱ्यांचे काम वाढले आहे. या विभागातील दुबार नावे वगळण्यासाठी सुमारे 500 पेक्षा जास्त बूथ अधिकारी येणाऱ्या काळात घरोघरी जाऊन मतदारांचा शोध घेणार आहेत.
भांडुप एस विभागात 69 हजार 500 व घाटकोपर एन विभागातही सुमारे 61 हजार 709 दुबार नावे आढळून आली आहेत. मालाड पी पूर्व, बोरिवली आर मध्य, कांदिवली आर दक्षिण भांडुप एस विभाग, मानखुर्द एम पूर्व, अंधेरी के पश्चिम विभागात 50 ते 55 हजार दुबार नावे असलेले मतदार आढळले आहेत. फोर्ट ए विभाग व डोंगरी पायधुनी बी विभागात प्रभागांची संख्या अनुक्रमे तीन व दोन असल्यामुळे येथे दुबार नाव नोंदवलेल्या मतदारांची संख्या कमी आहे.
विभागनिहाय दुबार नाव नोंदवलेले मतदार
अंधेरी के- पश्चिम - 58,405 , बोरवली आर-मध्य 54,970, अंधेरी के-पूर्व 35,822, कांदिवली आर-दक्षिण - 62,307, मालाड पी उत्तर - 39,341, मुलुंड टी विभाग - 29,328, ग्रँटरोड डी विभाग - 33,758, गोरेगाव पी-दक्षिण - 45,238, भांडुप एस विभाग - 69,500, घाटकोपर एन विभाग - 61,709, दादर जी-उत्तर - 39,851, बांद्रा एच-पश्चिम - 27,209, माटुंगा एफ-उत्तर - 38,763, कुर्ला एल विभाग - 78,825, सांताक्रुझ एच-पूर्व - 50,225, चेंबूर एम पश्चिम - 34,273, वरळी जी-दक्षिण - 47,953, दहिसर आर-उत्तर - 33,646, गोवंडी एम-पूर्व - 55,581 भायखळा ई विभाग - 31,422, परळ एफ-दक्षिण - 46,119, फोर्ट ए विभाग -13,204 चंदनवाडी सी विभाग -14,224, डोंगरी बी विभाग - 8,398, जोगेश्वरी के उत्तर - 40,557, मालाड पी पूर्व - 50,897.