Kopri Lake Incident Pudhari
मुंबई

Kopri Lake Incident: कोपरी तलावात बुडून २ चिमुरड्यांचा मृत्यू; दुर्घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांचा रुग्णालयात गोंधळ

नऊ आणि दहा वर्षांच्या मुलांचा दुर्दैवी अंत; बचाव पथक उशिरा पोहोचल्याचा ग्रामस्थांचा आरोप, महापालिकेकडून चौकशीचे आदेश

पुढारी वृत्तसेवा

कोपरखैरणे: नवी मुंबईतील कोपरी गाव तलावात दोन चिमुरड्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बुधवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली.

काही प्रत्यक्षदर्शीच्या मते दसऱ्याच्या दिवशी दुर्गापूजा विसर्जन वेळी भाविकांनी वाहिलेली नाणी मिळविण्याच्या प्रयत्नात ही दुर्दैवी घटना घडली. वाशी पोलिसांनी याप्रकरणी सध्या अपघाती मृत्यूची नोंद केली असून, पुढील कायदेशीर तपास सुरू केला आहे.

तलावात उतरलेल्या दोन किशोरवयीन मुलांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून प्राण गमवावे लागले. गणेश गुप्ता (वय ९) आणि गोलू मन्सुरी (वय १०, दोघेही रा. कोपरी गाव) अशी या दुर्दैवी बालकांची नावे आहेत. या घटनेमुळे कोपरी परिसरात मोठी शोककळा पसरली आहे.

मृत मुले दोघेही अत्यंत हलाखीच्या कुटुंबातील होती; त्यांचे वडील पाणीपुरी विक्री आणि मजुरीची कामे करून कुटुंबाचा गाडा हाकतात. बुधवारी सकाळी गणेश आणि गोलू हे दोघे कोपरी येथील तलावाच्या परिसरात गेले होते. दोघांनाही पोहता येत नसतानाही ते तलावाच्या पाण्यात उतरले. पाण्याचा गांभीर्याने अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडू लागले.

अग्निशमन दल आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांचा संताप

दुर्घटना घडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ अग्निशमन दल आणि वाशी पोलिसांना फोन करून माहिती दिली. मात्र, मदत पथक घटनास्थळी पोहोचायला ४५ मिनिटे ते एक तास उशीर झाला, असा थेट आरोप संतप्त ग्रामस्थांनी केला आहे.

बचाव पथक येण्यापूर्वी स्थानिक तरुणांनी स्वतः पाण्यात उतरून मुलांना शोधण्याचा प्रयत्न केला. जर यंत्रणा वेळेवर पोहोचली असती, तर कदाचित मुलांचे प्राण वाचले असते, अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली. मुलांना वाशी येथील महापालिका रुग्णालयात आणल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. यावेळी संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी रुग्णालयाच्या आवारात प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

तलावाच्या सुरक्षेबाबत पालिकेची अनास्था

कोपरी तलाव हा अत्यंत गजबजलेल्या भागात आहे. सणासुदीच्या काळात आणि विसर्जनानंतर अशा ठिकाणी लहान मुले पाण्यात उतरण्याचा धोका असतानाही तिथे एकही सुरक्षा रक्षक नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला.

विसर्जनानंतर तलावात निर्माल्य, बांबू आणि गाळ साचला होता. पालिका प्रशासनाने विसर्जन पार पडल्यानंतर तलावाची स्वच्छता न केल्यामुळे मुले या दलदलीत अडकल्याचा ठपका नागरिकांनी ठेवला आहे. नवी मुंबई महापालिका प्रशासनाने या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी तलावाभोवती लोखंडी जाळ्या बसवणे आणि सुरक्षेचे फलक लावण्याबाबत विचार केला जाईल, असे आश्वासन पालिकेने दिले आहे.

स्थानिकांचे शर्थीचे प्रयत्न निष्फळ

मुले बुडत असल्याचे लक्षात आल्यानंतर एका स्थानिक नागरिकाने त्यांना वाचवण्यासाठी तातडीने पाण्यात उडी घेतली आणि शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, तोपर्यंत पाण्याचा प्रवाह आणि खोलीमुळे दोन्ही मुले पाण्यात पूर्णपणे बुडाली होती. हातावर पोट असणाऱ्या कुटुंबातील चिमुरड्यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

या घटनेची माहिती मिळताच एपीएमसी पोलीस ठाण्याचे अधिकारी व जवान तसेच अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आपत्कालीन बचाव पथकाने तातडीने शोधमोहीम राबवत सुमारे तासभराच्या अथक प्रयत्नांनंतर दोन्ही मुलांचे मृतदेह तलावातून बाहेर काढले. वाशी पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

आपत्ती व्यवस्थापन उपायुक्त करणार चौकशी

कोपरी तलावात ही दुर्घटना घडली, त्यावेळी त्या ठिकाणी असणारा महापालिकेचा सुरक्षारक्षक प्रसाधनासाठी गेला असल्याने ही घटना घडल्याचे निदर्शनास आले आहे. सदर घटनेची गंभीरपणे दखल घेत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या उपआयुक्त यांना सदर संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT