कोपरखैरणे : लाखो रुपये खर्च करून ज्येष्ठ नागरिकांसाठी निर्माण करण्यात आलेल्या जॉगर्स ट्रॅकवर वाहने उभी करण्यात येतात. pudhari photo
मुंबई

Joggers track parking issue : कोपरखैरणेतील जॉगर्स ट्रॅकचा पार्किंगसाठी वापर

लाखो रुपयांचा खर्च पाण्यात; अतिक्रमण विभागाचे दुर्लक्ष

पुढारी वृत्तसेवा

कोपरखैरणे : कोपरखैरणे निसर्ग उद्यान परिसरात व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांना पायी चालण्यासाठी रस्त्याच्या कडेला आकर्षक रंग देऊन जॉगर्स ट्रॅक तयार करण्यात आले आहेत. मात्र त्यावर सरसकट गाड्या पार्किंग केल्या जात आहेत. याकडे महानगरपालिका अतिक्रमण विभागाकडूनही दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे यासाठी करण्यात आलेला लाखो रुपयांचा खर्च वाया गेल्यात चर्चा आहे.

नवी मुंबईत वाशीतील मिनी सीशोर आणि कोपरखैरणेतील निसर्ग उद्यान या ठिकाणी शहरातील सर्वात जास्त लोक मॉर्निंगवॉकसाठी येतात. त्यामुळे कोपरखैरणेतील निसर्ग उद्यानात व्यायामशाळा निर्माण करण्यात आली आहे. ती कमी पडत असल्याने दुसरी उभी केली आहे. या शिवाय जवळच असणाऱ्या दोन उद्यानातही व्यायामशाळा उभ्या करण्यात आल्या आहेत.

निसर्ग उद्यान आणि जवळच्या दोन्ही उद्यानात जॉगिंग करणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने खास ज्येष्ठ नागरिकांसाठी रस्त्याच्या कडेला वळणावर आकर्षक बैठक व्यवस्था आणि रस्त्याच्या कडेला रंगीत पट्टे दिले गेले आहेत. या रंगीत पट्ट्यावर ज्येष्ठ नागरिक चालतील. तसेच त्यांना बसण्यासाठी जागा केली आहे. मात्र या पट्ट्यावर दुचाकी, कार, ट्रक, बससुद्धा पार्किंग केल्या जात आहेत.

  • वर्दळ अत्यल्प असल्याने वाहतूक पोलीस इकडे फिरकत नाहीत. अतिक्रमण विभागही लक्ष देण्यास तयार नाही, अशी खंत विक्रम सिंग या जेष्ठ नागरिकाने व्यक्त केली.

  • पालिकेने चांगल्या उद्देशाने लाखो रुपये खर्च करून हे आकर्षक पट्टे रंगवले, मात्र पार्किंगमुळे झालेल्या खर्चाची भरपाई कोण करणार? असा प्रश्न सुजाता माने या ज्येष्ठ नागरिक महिलेने उपस्थित केला.

  • कोपरखैरणे विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त भरत धांडे यांना याबाबत विचारणा केली असता, या ठिकाणी मार्गदर्शक फलक लावणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT