Kolhapur News : बहुमजली इमारती वाढल्या, पार्किंगचा पत्ता नाही

महापालिकेच्या ठोस धोरणाचा अभाव; तातडीने उपाययोजना करणे आवश्यक
Kolhapur News
Kolhapur News
Published on
Updated on

डॅनियल काळे

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेने शहरातील पार्किंग समस्येबाबत ठोस धोरण आखण्याची गरज निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पार्किंगसाठी राखीव असलेल्या जागांवर अनधिकृत टपऱ्या आणि व्यावसायिकांनी कब्जा केला आहे. या दोन्ही प्रश्नांवर प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. बहुमजली इमारती वाढल्या; पण पार्किंगचाच पत्ता नाही, अशी स्थिती आहे.

बेकायदेशीर टपऱ्यांचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवून, महापालिकेच्या रिकाम्या जागांमध्ये फेरीवाल्यांसाठी स्वतंत्र मार्केट उभारणे गरजेचे आहे. त्याचबरोबर मोकळ्या जागांवर ‌‘पे अँड पार्क‌’ तसेच बहुमजली पार्किंग प्रकल्प उभारल्यास पार्किंगची समस्या काही प्रमाणात सुटू शकते.

शहराचा झपाट्याने विस्तार होत असून, बहुमजली आणि व्यावसायिक इमारतींची संख्या वाढत आहे. मात्र, या इमारतींमुळे रस्त्यावरच पार्किंग करण्याचे प्रमाण वाढले असून, वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होत आहे. दूरदृष्टीने काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा अभाव आणि लोकप्रतिनिधींना वेळ न मिळाल्यामुळे ही समस्या अधिकच बिकट झाली आहे.

महाद्वार, ताराबाई रोड, भवानी मंडप, भाऊसिंगजी रोड, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, राजारामपुरी तसेच मध्यवर्ती बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर बहुमजली इमारती उभ्या राहत आहेत. या इमारतींच्या नकाशांमध्ये पार्किंगची तरतूद दाखवली जाते; मात्र प्रत्यक्ष बांधकाम करताना ही जागा कमी केली जाते किंवा पूर्णपणे नाहीशी होते. अनेक वेळा पूर्णत्व प्रमाणपत्र ( उेाश्रिशींळेप उशीींळषळलरींश) टाळून नियमभंग लपवला जातो. याकडे नगररचना विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.

एकमेकांकडे बोट

बांधकाम परवानगी देण्याचा अधिकार नगररचना विभागाकडे असल्याने, बेकायदेशीर पार्किंग किंवा बंदिस्त जागांवर कारवाई करताना विभागीय कार्यालये जबाबदारी टाळतात. ‌‘परवानगी त्यांनी दिली, कारवाई आम्ही का करावी?‌’ असा सूर अधिकाऱ्यांतून उमटतो. मात्र, महापालिका प्रशासनाने समन्वय साधून या प्रश्नात ठोस भूमिका घेणे आवश्यक आहे.

व्हीनस कॉर्नर पार्किंगचा पर्याय

व्हीनस कॉर्नर गाडी अड्ड्याची जागा ब्ल्यू लाईनमध्ये येत असल्याने येथे बहुमजली पार्किंग प्रकल्प रखडला आहे. तरीही पावसाळ्यातील काही महिने वगळता उर्वरित काळात या जागेचा पार्किंगसाठी प्रभावी वापर होऊ शकतो. सध्या उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचमुळे दसरा चौकातील पार्किंग प्रामुख्याने न्यायालयीन वापरासाठी राखीव आहे आणि ती अपुरी पडत आहे. अशा परिस्थितीत व्हीनस कॉर्नर गाडी अड्ड्याचा पर्याय गांभीर्याने विचारात घेणे गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news