Konkan Railway Schedule pudhari photo
मुंबई

Konkan Railway Schedule : कोकण रेल्वेचे मान्सून वेळापत्रक सोमवारपासून

६५७ प्रशिक्षित कर्मचारी रेल्वे मार्गावरील धोकादायक ठिकाणी सज्ज

पुढारी वृत्तसेवा

कोपरखैरणे : कोकण रेल्वेने येत्या १५ जूनपासून २० ऑक्टोबरपर्यंत मान्सून वेळापत्रक जाहीर केले आहे. या कालावधीत जर पावसामुळे दृश्यतामान कमी असले तर रेल्वे ताशी ४० किलोमीटर वेगाने चालवण्याचे निर्देश लोको पायलटला देण्यात आले आहेत.

लोहमार्गावर १०० मिलीमीटरपेक्षा जास्त पाणी साचलेले असल्यास रेल्वे प्रवासी सुरक्षेसाठी थांबवण्यात येणार आहेत. सूचना पायलटला देण्यात आल्या आहेत. पाणी ओसरल्यानंतर थांबलेल्या रेल्वे पुन्हा मार्गक्रमण करणार आहेत. विशेष म्हणजे आपत्कालीन परिस्थितीत गरजेनुसार एस टी महामंडळ मदत घेतली जाणार आहे. तशी तजवीज करण्यात आलेली आहे, अशी माहिती कोकण रेल्वेचे चेअरमन संतोषकुमार झा यांनी शुक्रवारी सीबीडी बेलापूर येथील मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील नारकर यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पावसाळ्यात कोकण रेल्वे मार्गावर कोणतीही दुर्घटना घडू नये याची पूर्ण खबरदारी प्रशासनाने घेतली आहे. सर्वच स्थानकांवर आवश्यक असलेली वैद्यकीय उपकरणे आणि साहित्य उपलब्ध करण्यात आलेले आहे. रत्नागिरी आणि वेर्णा रेल्वे स्थानकात स्वयंचलित वैद्यकीय व्हॅन तयार ठेवण्यात आली आहे. या व्हॅनमध्ये ऑपरेशन थिएटर उपलब्ध असणार आहे. या व्हॅनच्या माध्यमातून जखमींवर तातडीने उपचार करता येणार आहेत, असे संतोषकुमार झा यांनी सांगितले.

पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी ६५७ प्रशिक्षित कर्मचारी कोकण रेल्वे मार्गावर धोकादायक ठिकाणी सज्ज असणार आहेत. दरड कोसळण्याचा धोका असलेल्या ठिकाणी लोखंडी जाळ्या बसवण्यात आल्या आहेत. रेल्वे मार्गावर दरड आणि दगड येऊ नयेत यासाठी काही ठिकाणी दरडींची किंटग करण्यात आली आहे. गॅबियन वॉलही बांधण्यात आल्या आहेत, अशी माहिती संतोषकुमार झा यांनी दिली.

उंच भरारी

कोकण रेल्वे देशात आणि विदेशात विविध प्रकल्पांवर काम करत आहे. यंदा कोकण रेल्वे प्रशासनाला सुमारे २२ हजार कोटी रुपयांचे टेंडर मिळाले आहेत. त्यामुळे येत्या आर्थिक वर्षात कोकण रेल्वेच्या महसुलात आणि नफ्यात मोठी वाढ होणार आहे.

प्रतिसाद अभावी पावसाळी रो रो सेवा यंदा नाही

खास करून गणपती सणासाठी कोकण रेल्वेने प्रवासी हलक्या वाहनांसाठी रो रो सेवा कोकण रेल्वेने सुरू केली होती. मात्र या सेवेला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे यंदा ही कार रो रो सेवा बंद करण्यात आली आहे, असे यावेळी संतोषकुमार झा यांनी सांगितले.

कोकण रेल्वे मार्गावर एकूण ७२ रेल्वे स्थानक आहेत. या सर्वच रेल्वे स्थानकांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली आहे. किती पाऊस पडला याची माहिती मिळण्यासाठी नऊ स्थानकांमध्ये पर्जन्यमापक यंत्रही बसवण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT