Konkan Railway Ro-Ro train service for Cars
नवी मुंबई : कोकण रेल्वे महामंडळ (Konkan Railway Corporation Limited - KRCL) येत्या गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास रोल ऑन/रोल ऑफ (Ro-Ro) रेल्वे सेवा सुरू करण्याचा विचार करत आहे.
ही सेवा कार वाहतुकीसाठी उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती KRCL चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांनी मंगळवारी बेलापूर (नवी मुंबई) येथील मुख्यालयात पत्रकार परिषदेत दिली.
झा यांनी स्पष्ट केलं की, "जर किमान 40 कार्स एकावेळी वाहतूक करण्यासाठी उपलब्ध झाल्या, तर आम्ही ही विशेष सेवा नक्की सुरू करू."
कोकण रेल्वेची रो-रो सेवा प्रामुख्याने ट्रक वाहतुकीसाठी वापरली जाते, जिथे वाहन चालकही स्वतःच्या वाहनासोबत प्रवास करू शकतो. मात्र, कार वाहतुकीसाठी रो-रो सेवा यापूर्वी सुरु करण्यात आलेली नव्हती. "मला कल्पनाच नव्हती की लोकांना त्यांची महागडी कार 750 किमी दूर नेण्याची गरज भासते," असे झा म्हणाले.
कार वाहतुकीसाठी विशिष्ट डब्यांत बदल करावे लागतील, हे त्यांनी मान्य केले असून, या गणपतीत विशेष ट्रेन जाहीर करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
झा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2023-24 या आर्थिक वर्षात कोकण रेल्वेने 301 कोटींचा नफा कमावला आहे. कोविड काळातील दोन वर्षे वगळता महामंडळ सातत्याने नफ्यात आहे. मागील 15 महिन्यांत महामंडळाने 3150 कोटींचे प्रकल्प निविदेद्वारे मिळवले असून सध्या 4087 कोटींचे प्रकल्प कार्यान्वित आहेत.
"या वर्षात आम्ही 15000 कोटींचे नवीन ऑर्डर्स मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की ते साध्य होईल," असं झा यांनी सांगितलं.
येत्या तीन वर्षांत प्रवाशांसाठी प्लॅटफॉर्म विस्तार, फूटओव्हर ब्रिज (FOB), रिटायरींग रूम्स अशा विविध सुविधा निर्माण करण्यासाठी ₹125 कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे.
महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागाने 11 स्थानकांच्या विकासासाठी ₹99 कोटी खर्च केले आहेत. याशिवाय, रत्नागिरी स्थानकासाठी केवळ MIDC मार्फत ₹39 कोटींची गुंतवणूक होत आहे.
"या वर्षाअखेरीस रत्नागिरी स्थानकाचा संपूर्ण कायापालट तुम्हाला पाहायला मिळेल," असंही झा यांनी सांगितलं.
कोविड काळात बंद करण्यात आलेले 8 स्थानक थांबे पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला आहे. तसेच, पर्नेम व ओल्ड गोवा बोगद्यांसाठी पर्यायी मार्गांचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून कार्यवाटपाची प्रतीक्षा असल्याचंही झा यांनी स्पष्ट केलं.
रेल्वे दुपदरीकरणासाठी ₹5100 कोटींचा प्रस्ताव
सध्या संपूर्ण कोकण रेल्वे मार्ग एकेरी असून, केवळ 47 किमीचा भाग दुहेरी आहे. उर्वरित मार्गासाठी “patch doubling” करण्याचा ₹5100 कोटींचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.
कर्ज फेडीसाठीही योजना
कोंकण रेल्वेवर सध्या ₹2750 कोटींचं कर्ज असून, यावर्षात ₹600 कोटींची रक्कम फेडण्याचा निर्धार महामंडळाने केला आहे.