साडेपाच हजार घरे विकण्यात कोकण मंडळाला अपयश pudhari photo
मुंबई

MHADA house sale : साडेपाच हजार घरे विकण्यात कोकण मंडळाला अपयश

पीएमएवाय योजनेकडे ग्राहकांची पाठ; सर्वाधिक घरे शिरढोणची

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : नमिता धुरी

मुंबईतील म्हाडाच्या घरांसाठी ग्राहकांमध्ये प्रचंड स्पर्धा असली तरी मुंबईच्या जवळपास असणाऱ्या परिसरातील हजारो घरांकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाची एकूण 5 हजार 698 घरे विक्रीविना शिल्लक आहेत. यापैकी 4 हजार 685 घरे प्रधानमंत्री आवास योजनेतील असून त्यातही शिरढोण येथील घरांची संख्या सर्वाधिक 4 हजार 164 इतकी आहे.

कोकण मंडळाने अत्यल्प उत्पन्न गटासाठी पीएमएवाय योजनेंतर्गत बांधलेल्या हजारो घरांची अनेकदा सोडत काढूनही ही घरे विकली गेली नाहीत. त्यामुळे दीड वर्षापासून म्हाडाने प्रथम प्राधान्य योजना राबवण्यास सुरुवात केली. याअंतर्गत ग्राहकांना सोडतीशिवाय थेट अर्ज करून घर घेता येते.

प्रथम प्राधान्य योजना राबवल्यानंतरही कोकण मंडळाची 5 हजार 698 घरे विकली गेलेली नाही. यात म्हाडाचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत. हे आव्हान पेलण्यासाठी म्हाडाने काही संस्थांची मदत घेतली.

या संस्था मध्यस्थी म्हणून काम करतात आणि ग्राहकांना अतिरिक्त सवलत देऊ करतात. यामुळे विरार-बोळींज आणि भंडार्ली येथील घरे विकण्यात काही अंशी यश आले. पीएमएवाय योजनेतील 38 घरे विरार-बोळींज येथे,तर केवळ 1 घर भंडार्ली येथे शिल्लक आहे. म्हाडाच्या योजनेतील बोळींजची 959 आणि भंडार्लीची 54 घरे विकण्याचे आव्हान आजही कायम आहे.

ग्राहकांच्या अल्प प्रतिसादाचे कारण काय ?

  • विरार-बोळींज येथील प्रकल्पात पाण्याची सोय नसल्याने ही घरे सोडतीत विकली गेली नव्हती. त्यानंतर येथे पाणी पुरवठ्याची सोय झाली. तसेच ही घरे रेल्वे स्थानकापासून जवळच्या अंतरावर आहेत. त्यामुळे प्रथम प्राधान्य योजनेतून किमान पीएमएवायमधील घरांची विक्री होऊ शकली. शिरढोण येथील घरे डोंबिवली रेल्वे स्थानकापासून साधारण 10 किमी लांब आहेत. रेल्वे स्थानकावरून दर एक तासाने सुटणारी बस प्रकल्पापर्यंत जाते. अन्य एक बस हेदुटणेपर्यंत जाते. तेथून पुन्हा शेअर रिक्षा करावी लागते.

  • शिरढोण प्रकल्पातून विरार-अलिबाग मल्टिमॉडल कॉरिडॉर जाणार असला तरी अद्याप त्याचे काहीच काम सुरू झालेले नाही. रस्ता सुरू झाल्यानंतरही अत्यल्प उत्पन्न गटाला त्याचा फारसा उपयोग नाही. सध्या तरी या प्रकल्पाचा परिसर सामसूम आहे. दैनंदिन गरजा भागवणारी दुकानेही जवळपास नाहीत. नियमित ये-जा करण्यासाठी पुरेशी प्रवासी साधने नाहीत. तब्बल 4 हजार 164 घरांना ग्राहकच मिळालेले नाहीत. याशिवाय खोणी, गोठेघर येथील घरेही अशाच काही कारणांमुळे शिल्लक आहेत.

कुठे किती घरे शिल्लक ?

पीएमएवाय योजना

शिरढोण 4164

खोणी 442

भंडार्ली 1

गोठेघर 58

बोळींज 38

म्हाडा योजना

भंडार्ली 54

विरार 959

  • 4 हजार 164 घरांना ग्राहकच मिळालेले नाहीत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT