नवी मुंबई: यावर्षी कोकण हापूसचा हंगाम उशिरा सुरू झाला असून तो लवकर संपण्याच्या मार्गावर आहे. देवगड आंब्याची सध्याची आवक पाहता या आंब्याचा हंगाम जेमतेम 15 मेपर्यंतच टिकेल, अशी स्थिती आहे, तर रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांतील आंबे साधारण 25 मेपर्यंत उपलब्ध असतील.
यावर्षी हापूस आंब्याला पावसाचा मोठा फटका बसला. तरीही हळूहळू वाशी एपीएमसी मार्केटमध्ये हापूसची आवक वाढू लागली आहे. सध्या मार्केटमध्ये कोकणातून साधारण 40 ते 45 हजार हापूस आंब्यांच्या पेट्या दाखल झाल्या आहेत. त्याचबरोबर दक्षिण भारतातूनही मोठ्या प्रमाणात आंबा आला असून, त्याच्या सुमारे 30 हजार पेट्या दाखल झाल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही आवक खूप कमी आहे. गेल्या वर्षी याच दिवशी साधारण 1 लाख पेट्या येत होत्या.
गेल्या सात दिवसांत हापूसच्या 2 लाख 84 हजार 342 पेट्यांची, तर परराज्यांतील आंब्याच्या 1 लाख 71 हजार 411 क्रेटची आवक झाली. 8 एप्रिल ते 13 एप्रिलपर्यंत एकूण 4 लाख 55 हजार 753 पेट्यांची एपीएमसीत आवक झाली. त्यामध्ये हापूसच्या 2 लाख हजार 84 हजार 342 पेट्यांची, तर परराज्यांतील आंब्याची 1 लाख 71 हजार 411 क्रेटची आवक झाली आहे. यामध्ये सर्वाधिक आवक ही सोमवारी 13 एप्रिल रोजी 78 हजार 98 पेट्यांची झाली. यामध्ये कोकण हापूसच्या 53 हजार 143 पेट्या, तर 24 हजार 955 क्रेड परराज्यांतील हापूसचे आहेत.
कोकणातील आंबा संपल्यानंतर गुजरातचा आणि त्यानंतर जुन्नरचा आंबा बाजारात येण्यास सुरू होईल. दक्षिण भारतातील आंबा मात्र जूनअखेरपर्यंत खायला मिळेल. युरोप आणि अमेरिकेला निर्यात सुरू झाली आहे, मात्र विमान भाडे प्रचंड वाढले आहे. अमेरिकेसाठी 600 रुपये प्रतिकिलो आणि युरोपसाठी 400 रुपये प्रतिकिलो भाडे मोजावे लागत आहे. अशी माहिती घाऊक व्यापारी संजय पानसरे यांनी दिली.
हापूस आंब्यांचे दर
कोकण हापूस 4,500 ते 6,000 रुपये पेटी
हलक्या दर्जाचा माल 2,000 रुपये
इतर जातींचे आंबे (प्रतिकिलो)
इतर राज्यांतील आंबे: 100 ते 250 रुपये
बदामी आंबा : 80 ते 120 रुपये
लालबाग आंबा : 70 ते 100 रुपये
तोतापुरी आंबा : 50 ते 60 रुपये