नवी मुंबई: मुंबई एपीएमसीतील घाऊक फळ बाजारात कोकण हापूसची पहिली पेटी शुक्रवारी मे. जनार्दन ॲण्ड कंपनी बापू भुजबळ या व्यापाऱ्यांकडे दाखल झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निलेश वसंत बांदकर विजयदुर्ग ( रामेश्वर) यांनी ही ६ डझन पेटी पाठवली असून ३५ ते ३८ हजार दर या पहिल्या पेटीला मिळणार असल्याचे व्यापाऱ्यांनी पुढारीला सांगितले.
दिवाळीच्या पाडव्याला आणखी सहा ते सात पेट्या पाठवणार असल्याचा निरोपही निलेश बांदकर यांनी पाठवला आहे. कोकण हापूसच्या एक ते दोन पेट्या डिसेंबर अखेरीस मुंबईत येण्याचा शिरस्ता गेल्या चार ते पाच वर्षांपासून आहे. त्यानंतर जानेवारीत २५ ते ३० पेट्यांची आवक होते.
१५ फेब्रुवारीपासून ही आवक वाढते आणि ५० ते १०० पेट्यांपर्यंत पोहोचते. मार्च ते जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मुबलक हापूस मुंबई एपीएमसीत उपलब्ध होतो. शेवटच्या तीन महिन्यांत तर ५० हजार ते १ लाख पेट्यांची रोजची आवक कोकणातून होते.
यंदा मात्र हापुसच्या आगमनाने ३० ऑक्टोबरचाच मुहूर्त गाठला. देवगडच्या गिर्ये रामेश्वर येथील प्रगतशील बागायतदार निलेश बांदकर यांनी पहिली पेटी हंगामापूर्वीच मुंबईकडे रवाना केली. ऑक्टोबर महिन्यातच हापूस आंब्याचे उत्पादन घेत त्यांनी नवा प्रयोग यशस्वी केला.