Kolhapuri chappal Prada Pudhari
मुंबई

Kolhapuri chappal Prada: प्राडाच्या 40 स्टोअर्समध्ये कोल्हापुरी चपला विक्रीला

राज्य सरकारसोबत वर्षभरापूर्वी केलेल्या करारानंतर उठला जागतिक ठसा

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: जागतिक फॅशन ब्रँड असलेल्या ‌‘प्राडा‌’ या कंपनीच्या जगभरातील 40 स्टोअर्समध्ये आता पारंपरिक कोल्हापुरी चपला विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. वर्षभरापूर्वी प्राडाने राज्य सरकारसोबत करार करत ही कला जगभर नेण्यासाठी कारागिरांना प्रशिक्षित करण्याचे ठरविले होते. त्यानुसार, कारागिरांनी तयार केलेल्या चपला मंगळवारपासून प्राडाच्या जगभरातील 40 स्टोअरमध्ये उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

देशभरात नावाजलेल्या कोल्हापूरी चपला जागतिक ठसा उमटवीत आहेत. अनेक वर्षांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोनच राज्यातील कारागिर या चपलांची बांधणी करत आले आहेत. त्यातही कोल्हापुरातील कारागिरांकडून तयार करण्यात येणाऱ्या चपला या सर्वोत्तम मानल्या जातात.

परंतु, जून 2025 मध्ये इटलीच्या प्राडा या कंपनीने पुरुषांसाठी आपले स्प्रिंग/समर कलेक्शन सादर केले. या फॅशन शोमध्ये मॉडेलने परिधान केलेल्या चामडी सँडल्सची रचना महाराष्ट्रातील पारंपरिक आणि जीआय नोंदणीकृत कोल्हापुरी चप्पलप्रमाणे अत्यंत साम्य दर्शवणारे असल्याचे निदर्शनास आले.

या घटनेनंतर सामाजमाध्यमांवर व पारंपरिक कारागिर समूहांतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. अखेर प्राडा कंपनीने राज्य सरकारला संपर्क साधून याविषयी परस्पर सहकार्य करण्याची प्रक्रिया सुरू केली होती.

त्यानंतर प्राडाच्या प्रतिनिधीमंडळाने कोल्हापूरला भेट देत कारागिरांशी संवाद साधला. चर्चेनंतर डिसेंबर 2025 मध्ये मुंबईतील इटलीच्या वाणिज्य दूतावासात लिडकॉम (संत रोहिदास चर्मउद्योग) आणि प्राडा यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला होता.

या करारानुसार, प्राडा पुढील तीन वर्षांसाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकातील 300 कोल्हापुरी कारागिरांना प्रशिक्षण देण्यासाठी पूर्ण निधी उपलब्ध करून देणार आहे. हे प्रशिक्षण नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (एनआयएफटी) आणि कर्नाटक इन्स्टिट्यूट ऑफ लेदर अँड फॅशन टेक्नॉलॉजी येथे दिले जाईल.

त्यापैकी सर्वोत्तम 30 कारागिरांना इटलीतील प्राडा अकादमीमध्ये प्रगत प्रशिक्षणाची संधीही मिळणार आहे. या कराराअंतर्गत तयार झालेल्या चपला मंगळवारपासून जगभरातील प्राडाच्या 40 स्टोअर्समध्ये उपलब्ध होण्यास सुरूवात झाली आहे.

याविषयी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रातील कारागिरांच्या सृजनातून जन्मलेली कोल्हापुरी चप्पल आता जागतिक लक्झरी उत्पादन बनली असून ‌‘मेड इन इंडिया‌’ची ताकद महाराष्ट्राने जगासमोर प्रभावीपणे सादर केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT