Kishor Kadam
मुंबई : मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेते आणि कवी सौमित्र म्हणून ओळखले जाणारे किशोर कदम सध्या एका गंभीर समस्येत सापडले आहेत. अंधेरीतील त्यांच्या राहत्या ‘अंधेरी हवा महल’ सोसायटीच्या पुनर्विकास प्रक्रियेत मोठी फसवणूक झाल्याचा आरोप त्यांनी केला असून, यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.
किशोर कदम हे अंधेरी पूर्व येथील चाकाला परिसरातील ‘अंधेरी हवा महल’ या सोसायटीत गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहेत. त्यांच्या सोसायटीमध्ये पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू असून, यात मोठी फसवणूक होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कदम यांच्या मते, सोसायटी कमिटीने बिल्डर आणि पीएमसीच्या दबावाखाली येऊन सभासदांची दिशाभूल केली आहे. अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेली ही इमारत DCPR 33(11) आणि 33(12)B या नियमांनुसार, म्हणजेच SRA (झोपडपट्टी पुनर्वसन) योजनेअंतर्गत विकसित केली जात असल्याची धक्कादायक बाब नुकतीच उघडकीस आली आहे. कदम यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "कमिटी चौकस नसेल आणि बिल्डरच्या चुकीच्या प्रभावाखाली असेल, तर सामान्य माणसांची राहती घरे एखाद्या ट्रान्झिट कॅम्पसारखी होण्याची भीती असते. आमच्या सोसायटीत मूर्खांच्या बहुमताचा गैरफायदा घेतला जात आहे."
सोमवारी किशोर कदम यांनी पोस्ट करून मुख्यममंत्री, उपमुख्यमंत्री आणि सहकारमंत्र्यांनी एका कलावंताचे घर वाचवण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या तक्रारीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. फडणवीस यांनी म्हटले आहे की, "आपली तक्रार मी सहकार सचिव प्रवीण दराडे आणि एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांना सांगितली असून, त्यांना यात लक्ष घालण्यास सूचित केले आहे. आपल्याशी ते संपर्कात राहतील."