राजेश सावंत
मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंच्या एकीमुळे नगरसेवकांची संख्या वाढेल, पण सत्तेपर्यंत पोहोचणे अशक्य आहे. पालिकेवर सत्ता आणायची असेल तर दोन्ही बंधूंना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची साथ मिळणे आवश्यक आहे. याला उद्धव ठाकरे तयार होतील; पण काँग्रेसला सोबत घेऊन निवडणूक लढवण्यास राज ठाकरे तयार होतीलच असे नाही. त्यामुळे या नव्या आघाडीचा तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिकेच्या सत्तेपासून भाजपा व शिंदेंच्या शिवसेनेला दूर ठेवण्यासाठी येणार्या महापालिका निवडणुकीत सर्व पक्ष एकत्रित येण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांची मने जुळलेली असली तरी या आघाडीमध्ये राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सामील करून घेण्यासाठी ठाकरे गटाचे प्रयत्न सुरू आहेत. पण मनसेचा मराठी बाणा, हिंदी भाषेला होणारा विरोध, उत्तर भारतीयांच्या विरोधात असलेली राज ठाकरे यांची मते यामुळे तर भारतीय मतदार दुखावले जाऊ शकतात. एवढेच काय तर मुस्लिम मतदारही दुखावले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनसेच्या आघाडी प्रवेशाला काँग्रेस विरोध करू शकतो. एवढेच काय तर स्वतः राज ठाकरे काँग्रेससोबत जाण्यास तयार होणार नसल्याचे बोलले जात आहे.
शिवसैनिक व मनसैनिकांनीही एकत्र यावे असे मराठी माणसाला वाटत आहे. पण या एकत्रित येण्याला काँग्रेस अडसर ठरू शकते. राज ठाकरे यांचे काँग्रेसबद्दलचे मत फारसे चांगले नाही. त्यात काँग्रेससोबत आघाडी करून निवडणूक लढवल्यास मनसेच्या मराठी बाण्याचे काय, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
ठाकरे बंधू एकत्र आल्यावर एक गठ्ठा मराठी मते आघाडीच्या पारड्यात पडतील असे सांगण्यात येत असले तरी, ते शक्य नाही. मुंबईत अनेक मराठी माणसे अगदी भाजपासह शिवसेनेच्या शिंदेंनाही मानणारी आहेत. त्यामुळे मुंबईतील सुमारे 38 टक्के मराठी मतांपैकी 12 ते 15 टक्के मते भाजपाच्या पारड्यात पडू शकतात. पण आघाडीकडे असलेली 19टक्के मुस्लिम मते निर्णयक ठरू शकतात. त्याशिवाय काही उत्तर भारतीय व दक्षिण भारतीय मते आघाडीकडे वळू शकतात.
मुंबई महानगरपालिकेच्या फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीचा विचार करता या निवडणुकीत अखंडित असलेल्या शिवसेनेला सर्वाधिक 30.41 टक्के पडली होती. दुसर्या क्रमांकाची 28.28 मते भाजपाने घेतली होती. काँग्रेसला 16.69, मनसेला 8.52, राष्ट्रवादीला 5.74 टक्के मते मिळाली होती. परंतु यावेळी शिवसेना दुभंगल्यामुळे ठाकरे गटाच्या टक्केवारीमध्ये 12 ते 15 टक्के कपात होण्याची शक्यता आहे. पण काँग्रेसच्या टक्केवारीमध्ये फारशी कपात होणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही काही मतांची विभागणी होण्याची शक्यता आहे. पण ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मनसे एकत्रित आल्यास ही टक्केवारी निश्चितच 45 ते 50 टक्क्यांपर्यंत जाईल. त्यामुळे सत्ता स्थापन करण्यापासून ठाकरेंना कोणी रोखू शकणार नाही.