मुंबई

किरीट सोमय्या : मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून एफआयआर नोंदविण्यास नकार

अविनाश सुतार

मुंबई : पुढारी ऑनलाईन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून मुंबई पोलीस आयुक्तांनी माझा एफआयआर नोंदविण्यास नकार दिला. त्याचबरोबर बनावट एफआयआरच्या आधारावर तपास सुरूही केला, असा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज (मंगळवार) येथे केला. उद्या (बुधवारी राज्यपालांना भेटून तक्रार देणार असल्याचेही सोमय्या यांनी सांगितले. खार पोलीस ठाण्यातून बाहेर आल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

सोमय्या म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून मुंबई पोलीस आयुक्तांचा एफआयआर नोंदविण्यास नकार दिला. वेबसाईटवरील एफआयआरवर माझी सही नाही, हे पोलिसांनीही कबुली दिली आहे. एफआयआरवर माझी सही पाहिजे होती, याची आयुक्तांनाही कल्पना होती. परंतु पोलीस आयुक्तांच्या सांगण्यावरून खार पोलिसांनी पेपर फाडून टाकले. त्यामुळे पोलीस आय़ुक्तांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावे्ळी केली.

खार पोलीस ठाण्यात १०५ मिनिटे माझा जबाब नोंदविण्यात आला. पण पोलीस आयुक्तांचा फोन आल्यानंतर पेपर फाडून टाकण्यात आले. एफआयआर अवैध असल्याचे पोलिसांनी कबुली दिली आहे. शनिवारी हल्ल्याच्या वेळी माझा जीव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. ठाकरेंच्या गुंडाकडून हल्ला करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्या प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत, असेही सोमय्या यांनी सांगितले.

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर 23 एप्रिल रोजी हल्ला झाल्यानंतर दोन्ही पक्षांतला संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. राणा दाम्पत्याच्या अटकेच्या प्रकरणात आता किरीट सोमय्यांच्या एन्ट्रीनंतर वाद अधिकच चिघळला. किरीट सोमय्या खार पोलीस स्टेशनला पोहोचताच शिवसैनिकांनी गोंधळ घातला. पोलीस स्टेशनमधून बाहेर पडल्यानंतर शिवसैनिकांनी सोमय्यांच्या कारवर चपला फेकल्या.
शिवसैनिकांच्या हल्ल्यानंतर किरीट सोमय्या यांनी मुंबई पोलीस माझा FIR घेत नाहीत, असं म्हणत वांद्रे पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या दिला. यानंतर त्यांनी मुंबई पोलिसांनी खोटा एफआयआर दाखल केल्याचा आरोप केला. हा एफआयआर बोगस असून त्याविरोधात लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी सोमय्या यांनी केली आहे.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT