kirit somaiya Pudhari
मुंबई

Kirit Somaiya protest: घाटकोपर पोलीस ठाण्यात किरीट सोमय्यांचे ‌‘ठिय्या आंदोलन‌’; महिलेकडून खोटा जबाब घेतल्याचा आरोप

अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी

पुढारी वृत्तसेवा

घाटकोपर: अत्याचारग्रस्त पीडित मुलीच्या आईकडून पोलिसांना मारहाण केल्याचा खोटा जबाब घेतल्याचा आरोप करत संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कारवाईच्या मागणीसाठी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सोमवारी घाटकोपर पोलीस ठाण्यासमोर आणि नंतर पोलीस ठाण्यातील कारागृहासमोर ‌‘ठिय्या आंदोलन‌’ केले.

दोन दिवसांपूर्वी घाटकोपरच्या नित्यानंद नगरात दोन अल्पवयीन मुलींवर फिरोज ऊर्फ सनी इक्बाल शेख(38) या आरोपीने लैंगिक अत्याचार केला होता.

या आरोपीला रंगेहात पकडल्यावर स्थानिक नागरिक आणि मुलींच्या कुटुंबियांनी आरोपीला मारहाण करताना काही पोलिसांनाही मारहाण झाल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. यात चार पीडित कुटुंबियांच्या नातेवाईकांसह स्थानिकांना अटक करण्यात आली.

त्यात पोलिसांनी पीडित मुलींच्या आईच्या जबाबात अशाप्रकारे मारहाण केल्याचा उल्लेख केला. मात्र आपण असा जबाब दिलाच नसल्याचे पीडित मुलीच्या आईने भाजप नेते किरीट सोमय्या यांना पत्र लिहून कळविले.

त्यामुळे सोमवारी सोमय्या हे घाटकोपर पोलिसांना जाब विचारण्यासाठी आले होते. ज्या अधिकाऱ्याने हा खोटा जबाब घेतला त्याच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी सोमय्या यांनी घाटकोपर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांच्याकडे केली. मात्र पोलिसांकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने सोमय्या यांनी आधी पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारावर आणि मग घाटकोपर पोलीस ठाण्याच्या कारागृहासमोर ठिय्या आंदोलन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT