Devendra Fadnavis (Pudhari File Photo)
मुंबई

Kharat Case Maharashtra: खरातप्रकरणी राजकारण करू नका; विरोधी पक्षाचे कोण कोण नेते गेले, त्याचे पुरावेही देऊ शकतो: मुख्यमंत्री

वडेट्टीवारांचा भांडाफोडचा इशारा, ठाकरे यांचे आव्हान; अधिकारी व नेत्यांवर आरोपांमुळे विधिमंडळात गदारोळाची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

सोमवारी विधानसभेत मंत्री, नेते, अधिकारी यांचा भांडाफोड करणार ः वडेट्टीवार

अजून कुठपर्यंत पाणी मुरतंय ते पाहा : उद्धव ठाकरे

अटकेपूर्वी काही सनदी अधिकाऱ्यांची खरातसोबत शिर्डीत बैठक झाल्याचा काँग्रेस नेत्यांचा दावा

अनेक आयएएस आणि आयपीएस अधिकारी या प्रकरणात गुंतल्याचा विरोधकांचा आरोप

विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता

मुख्यमंत्र्यांनी सर्वाधिक माहिती असल्याचे सांगत दिला इशारा

मुंबई : अशोक खरातसंदर्भात काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी विधिमंडळात सरकारचा भांडाफोड करणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरात प्रकरण गंभीर असून त्याचे राजकारण करू नका, असा सल्ला देतानाच सर्वाधिक पुरावे तर आपल्याकडे आहेत. विरोधी पक्षाचे कोण कोण नेते गेले, याचे पुरावे मी देऊ शकतो, असा इशारा त्यांनी दिला.

इंटेलिजन्सच्या आधारावर आम्हीच या प्रकरणाचा भांडाफोड केला आहे. आता हळूहळू पीडितांना धीर देऊन महिलांना समोर आणणे सुरू आहे. काही महिला प्रतिसाद देत आहेत. याप्रकरणी पोलीस महासंचालकांना लक्ष ठेवण्यास सांगण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

चौकशीसाठी एसआयटी तयार केलेली आहे. नाशिक पोलीस आयुक्त आणि एसआयटी मिळून तपासाचे काम करत आहेत. या प्रकरणात आम्ही कोणालाही सोडणार नाही. याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न सुरू आहे. कुणाजवळ काही पुरावा असेल तर तो त्यांनी आणून द्यावा, त्यावरही कारवाई होईल. विरोधी पक्षाचे कोण कोण नेते गेले, याचे पुरावे मीसुद्धा देऊ शकतो. सर्वात जास्त तर पुरावे माझ्याकडे आहेत. पण ते पोलिसांकडे आहेत. ते पोलिसांचे काम आहे, माझे काम नाही, असेही फडणवीस म्हणाले.

यापेक्षा वाईट गुन्हाच नाही

तथाकथित शक्तींचा वापर करून महिलांना भरीस पाडणे, यापेक्षा वाईट गुन्हा असू शकत नाही. काहीही झाले तरी त्यांना याची शिक्षा भोगावीच लागेल. याकरिता जे जे करावे लागेल ते करायला सरकार आणि पोलीस तयार आहेत, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

अजून कुठंपर्यंत पाणी मुरतंय ते पाहा : उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री फडणवीस यांनी भोंदू अशोक खरात याच्या मिरगाव येथील शिवनिका संस्थानला दारणा धरणातून पाणी देण्याच्या उद्धव ठाकरे सरकारच्या निर्णयाची चौकशी करण्याचा इशारा दिला आहे. त्यावर उद्धव ठाकरे यांनी या निर्णयाची खुशाल चौकशी करा, असे सांगताना खरात प्रकरणाचे पाणी अजून कुठंपर्यंत मुरले आहे, ते पण पाहा, असे सांगत खरातशी संबंध असलेल्या मंत्री आणि नेत्यांवर कारवाई करून दाखवा, असे आव्हान दिलेे.

आज विधिमंडळात पडसाद उमटणार?

विजय वड्डेट्टीवार यांनी अशोक खरात प्रकरण सोमवारी विधानसभेत मांडणार असल्याचा इशारा दिला आहे. या प्रकरणात सरकारमधील मंत्री आणि नेते अडकले आहेत. त्यांचे संबंध समोर आले आहेत. काही वरिष्ठ अधिकारी आणि सनदी अधिकारी यांचेही कनेक्शन समोर आले आहे. खरातच्या अटकेपूर्वी काही सनदी अधिकाऱ्यांची खरातसोबत शिर्डीत बैठक झाली होती, हे देखील समोर आले आहे. अनेक आयएएस आणि आयपीएस अधिकारी या प्रकरणात गुंतले आहेत. त्यामुळे त्याचाही भांडाफोड करण्याचा इशारा वडेट्टीवार यांनी दिला आहे. त्यामुळे सोमवारी भोंदूबाबा खरात प्रकरण विधिमंडळात गाजण्याची शक्यता आहे.

... म्हणून चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागला

भोंदूबाबा खरातसोबतची छायाचित्रे व वक्तव्य समोर आल्याने महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागला. त्यासोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मंत्री दीपक केसरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आदी नेत्यांचे खरातसोबतचे फोटो समोर आले आहेत. त्यावरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वाधिक पुरावे आपल्याकडे असल्याचा इशारा दिल्याने सभागृहात काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवनिकाला महाविकास आघाडी सरकारच्या काळात पाणी दिले

खरातला भेटणाऱ्यांपैकी कोणाचा थेट सहभाग असेल तर त्यांच्यावर कारवाई होणारच आहे. पण केवळ भेटले म्हणून कारवाई करायला लागलो तर मग कसं आणि काय करायचं, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. खरातच्या मिरगाव येथील शिवनिका संस्थानला दारणा धरणातून 39 लाख लिटर पाणी आरक्षित करण्याचा निर्णय 31 जुलै 2020 रोजी घेण्यात आला होता. त्यावेळी राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार होते. देवेंद्र फडणवीस यांनी नियमबाह्य पाणी देण्याचा मुद्दा उपस्थित केला. शेतकऱ्यांसाठी असलेल्या धरणातून शिवनिका संस्थानसाठी 40 किलोमीटरची पाईपलाईन कोणी टाकली, त्यांना काय शिक्षा द्यायची, असे फडणवीस म्हणाले. मंत्र्यांबद्दल बोलणारे त्यांच्याबद्दल का चूप आहेत, तोंडाला का कुलूप लावले आहे, असा सवाल फडणवीस यांनी विजय वडेट्टीवार यांना केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT