Ramkrishnanagar Redevelopment Pudhari
मुंबई

Khar Mhada Redevelopment: खारमधील म्हाडाच्या 56 वसाहतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा, घरांचा आकारही वाढणार

Ramkrishnanagar Redevelopment: विकासक नियुक्तीला मंत्रिमंडळाची मंजुरी; ५६ वसाहती, ११४ गृहनिर्माण संस्‍थांचा होणार जीर्णोद्धार

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: खार पश्चिमेतील रामकृष्णनगरमधील जुन्या म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मुंबईतील खार (प) येथील रामकृष्णनगर मधील म्हाडाच्या इमारतींचा समूह पुनर्विकास करण्यास व त्यासाठी विकासक नियुक्तीस मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

मुंबई शहर व उपनगर क्षेत्रामध्ये परवडणारी घरे निर्माण करण्याकरीता शासनाने महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई मंडळामार्फत मध्यम उत्पन्न गट व अल्प उत्पन्न गट या गटांकरीता १९५० ते १९६० च्या दरम्यान ५६ वसाहतीची निर्मिती केलेली होती.

५६ वसाहतींमध्ये ११४ गृहनिर्माण संस्था आहेत. या ११४ सहकारी संस्थामध्ये रामकृष्ण नगर, सी.टी.एस. क्र.८७२ ए/१ व ८७२ ए/२, खार (प) मुंबई यांचा समावेश आहे. त्यातील काही इमारती जीर्ण व मोडकळीस आल्यामुळे त्यांचा पुनर्विकास करून रहिवाश्यांचे राहणीमान उंचाविण्यासाठी समूह पुनर्विकास मान्यता देण्यात आली आहे.

रामकृष्ण नगर, खार (प) संस्थेच्या जमिनीचे क्षेत्रफळ २५,५२३.९० चौ.मी. आहे. त्यामध्ये एकूण १९ (१८ इमारती व १ कार्यालयीन इमारत) इमारती आहेत. त्या १९८५ च्या दरम्यान बांधण्यात आल्या आहेत.

या १९ इमारतींपैकी ३ इमारती असलेले भूखंड क्र. ५, ७ व ८ हे भूखंड म्हाडामार्फत रामकृष्ण नगर सह. गृह. संस्थेस मालकी तत्वावर वितरीत करण्यात आले आहेत. यातील भूखंड क्र, १८ व कार्यालयीन इमारतीच्या ( क्र. १) भूखंडांचे क्षेत्र वगळून उर्वरीत भुखंडावर विकासकाची (सी अँण्ड डी.ए.) नियुक्ती करून म्हाडाच्या माध्यमातून समूह पुनर्विकास करण्यास मान्यता देण्यात आली.

निर्णयाचा रहिवाशांना दिलासा

रामकृष्णनगरमधील काही इमारती जुन्या झाल्याने त्यांची अवस्था चिंताजनक झाली आहे. त्यामुळे स्वतंत्र इमारतींच्या पुनर्विकासाऐवजी संपूर्ण परिसराचा एकत्रित विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या प्रक्रियेमुळे रहिवाशांना अधिक चांगल्या निवासव्यवस्थेचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. या इमारतींचे बांधकाम साधारण १९८५ च्या आसपास करण्यात आले होते. त्यामुळे कालांतराने जुन्या झालेल्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न निर्माण झाला होता.

मूळतः मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मध्यम व अल्प उत्पन्न गटातील नागरिकांनापरवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाने १९५० ते १९६० या कालावधीत ५६ वसाहती उभारल्या होत्या. या वसाहतींमध्ये एकूण ११४ गृहनिर्माण संस्थांचा समावेश होता. रामकृष्णनगर ही त्यापैकी एक वसाहत आहे.

प्रकल्‍पासाठी समिती नेमणार

रामकृष्‍ण नगरचा हा पुनर्विकास प्रकल्प जलद गतीने राबविण्यासाठी गृहनिर्माण विभागाचे सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती स्थापन करण्यास मंजूरी देण्यात आली. प्रकल्पाच्या विविध टप्प्यांतील निर्णय आणि अंमलबजावणीमध्ये विलंब होऊ नये, यासाठी ही समिती स्थापन करण्यात येणार आहे.

प्रकल्पातील काही घरे म्हाडाला सोडतीसाठी

रामकृष्णनगरमधील रहिवाशांची घरे सध्या ३८७ ते ५०५ चौरस फुटांची आहेत. पुनर्विकास झाल्यानंतर रहिवाशांना ८८२ ते १ हजार १२० चौरस फुटांची घरे मिळणार आहेत.

शिवाय म्हाडाला या प्रकल्पातील काही घरे सोडतीसाठी उपलब्ध होतील. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या कार्यक्षेत्रातील रामकृष्णनगरचा उल्लेख म्हाडाच्या अधिकृत नोंदींमध्येही करण्यात आला आहे.

आता विकासक नियुक्तीची प्रक्रिया, पुनर्विकासाचे नियोजन आणि पुढील प्रशासकीय कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष प्रकल्पाला गती मिळण्याची अपेक्षा आहे.जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासोबतच रहिवाशांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडणे हे या प्रकल्पाच्या अंमलबजावणीतील पुढील महत्त्वाचे आव्हान राहणार आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT